मॉर्निंग वॉकला गेलेला शिक्षक अपघातात ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या निवृत्त शिक्षकाला दुचाकीस्वार बुरखाधारी महिलेने धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद - मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या निवृत्त शिक्षकाला दुचाकीस्वार बुरखाधारी महिलेने धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता.16) सकाळी सव्वासहाच्या सुमारास जालनारोडवरील सोनी हॉस्पिटलसमोर घडला. वसंत अण्णा निलख (रा. न्यू शांतिनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. ते पंधरा दिवसांपूर्वीच निवृत्त झाले होते. 

नेहमीप्रमाणे निलख मंगळवारी सकाळी दोन मित्रांसोबत फिरायला गेले होते. ऍपेक्‍स हॉस्पिटलसमोरून पायी जाताना त्यांना दुचाकीस्वार महिलेने धडक दिली. यात निलख गंभीर जखमी झाले. त्यांना मित्रांनी लगेचच रुग्णालयात दाखल केले; परंतु डोक्‍याला मागे गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा सकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. निलख शिवाजीनगर येथील मेहरसिंग नाईक विद्यालयात शिक्षक होते. 30 जूनला ते निवृत्त झाले होते. अपघातानंतर जिन्सी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली असून, धडक देणाऱ्या दुचाकीचा तपास केला जात आहे. 
 
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 
कारच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात पंधरा जुलैला सायंकाळी मृत्यू झाला. हा अपघात एक जुलैला रात्री अकराच्या सुमारास रेल्वेस्थानक एमआयडीसी कॉलनीमध्ये घडला होता. मिलिंद चंद्रकांत पाटील (वय 35, रा. एमआयडीसी कॉलनी, सुदर्शन कॉलनी) कारच्या धडकेत जखमी झाले होते. मिलिंद पाटील रात्री दुचाकीने घरी जात होते. एमआयडीसी कॉलनीतील देवीच्या मंदिरासमोर त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या भरधाव कारची धडक बसली. त्यात पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघाताची नोंद वेदांतनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. 
 
अपघातात महिला जखमी 
दुचाकीने धडक दिल्याने अनुराधा सतीश कदम या जखमी झाल्या. हा अपघात पडेगाव तारांगण येथे तेरा जुलैला घडला. याबाबत अनुराधा कदम यांनी तक्रार दिली. त्यानुसार छावणी पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध (एमएच- 20, सीव्ही- 7083) छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Teacher killed in bike accident at Aurangabad