मराठवाड्यात महसूलच्या कारभाराला संपाचा फटका

राजेभाऊ मोगल
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

संपाला शंभर टक्‍के प्रतिसाद 

सकाळी साडेसात वाजेपासून सुरू झालेल्या या संपात सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी शंभर टक्‍के संपात सहभाग घेतला. अशी माहिती राज्य उपाध्यक्ष सतीश तुपे, सहसचिव देविदास जरारे यांनी दिली.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून सरकारसोबतच्या झालेल्या बैठकांमधून काहीही ठोस निर्णय निघाला नसल्याने मंगळवापासून सुरू झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा महसूल विभागाच्या कामकाजाला चांगलाच फटका बसला आहे.

मराठवाड्यातील सहा हजार 121 अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी केवळ 540 कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामांवर हजेरी लावली. यामुळे दिवसभरात दैनंदिन कामकाज खोळंबले होते. आणखी दोन दिवस हा संपच सुरूच राहणार आहे. 

सातवा वेतन आयोग लागू करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन लागू करा, पाच दिवसांचा आठवडा करा, या मागण्यांसाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी तीनदिवसीय संपाची हाक दिली होती. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मंगळवारपासून (ता. सात) संपाला सुरवात केली.

कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयाच्या दारात घोषणाबाजी केली. दिवसभर कामकाज ठप्प झालेले होते. महसूल विभागात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्‍तालयात केवळ अधिकारीच आपल्या कार्यालयांत खुर्च्यांवर बसलेले पाहायला मिळाले. 

मराठवाड्यात वर्ग एकचे 193, वर्ग दोनचे 375, वर्ग तीनचे चार हजार 709, तर वर्ग चारचे 844 असे सहा हजार 121 अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांपैकी वर्ग एकचे सात, वर्ग दोनचे 34, वर्ग तीनचे 4625, तर वर्ग चारचे 928  असे 5594 जणांनी संपात थेट सहभाग नोंदविला आहे. या संपाच्या पार्श्‍वभूमीवर 118 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रजा टाकलेली आहे. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्थिती 

जिल्हा - एकूण संख्या - उपस्थिती 
औरंगाबाद - 941 - 62 
बीड - 891 - 68 
उस्मानाबाद - 646 - 83 
लातूर - 819 - 78 
नांदेड - 1191 - 100 
हिंगोली - 380 - 49 
परभणी - 507 - 58 
जालना - 746 - 42 

---- 
एकूण - 6121 - 540 

Web Title: Revenue work strike collapses in Marathwada