esakal | लातूर जिल्ह्यात सुधारित हंगामी पैसेवारी पन्नासपेक्षा जास्त, मात्र असमाधानकारक वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Damaged

लातूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती.

लातूर जिल्ह्यात सुधारित हंगामी पैसेवारी पन्नासपेक्षा जास्त, मात्र असमाधानकारक वाढ

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती. यामुळे पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित हंगामी पैसेवारीवर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व ९५१ गावांतील खरिपाची पीकपैसेवारी सरासरी ५५ आली आहे.

पंकजा मुंडे नाराज नाहीत, मी हात जोडून सांगतो! चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली विनंती

एकाही गावाची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी आली नसली तरी उत्पन्नात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. जिल्ह्यात सरकारच्या सर्वेक्षणानुसार ९५१ गावांपैकी ८३१ गावांत खरीप तर १२० गावांत रब्बीचे पिके घेण्यात येतात. असे असले तरी रब्बीच्या गावांतही खरिपाचे पिके घेण्यात येत असल्याने जिल्ह्यात केवळ खरिपाची पीक पैसेवारी काढण्यात येते. रब्बीची पीक पैसेवारी काढण्यात येत नाही. ३० सप्टेंबर रोजी पिकांची परिस्थिती पाहून नजर अंदाजे पैसेवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार पीक कापणी प्रयोग घेऊन ३० ऑक्टोबर रोजी सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात येते.

खरिपातील तुरीच्या पिकांची काढणी उशिरा होत असल्याने तुरीच्या कापणी प्रयोगानंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी काढण्यात येते. पन्नासपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतर टंचाईच्या काळातील विविध उपाययोजना तसेच काही सवलती लागू होतात. पैसेवारी जास्त आल्यास या सवलती लागू होत नाहीत. यावर्षी जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५५ आल्याने टंचाईसदृश्य तसेच दुष्काळाच्या उपाययोजना तसेच सवलतीचा लाभ मिळत नसला तरी पैसेवारी सहाने जास्त आल्याने अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादमध्ये ३९ हजार नागरिक आजारी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून माहिती आली समोर

यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. जोरदार पाऊस झाला नसला तरी योग्यवेळी पाऊस झाल्याने पिकांची चांगली वाढ होऊन मोठ्या उत्पन्नाच्या आशा शेतकऱ्यांना होत्या. मोठा पाऊस नसल्याने तलाव व प्रकल्पांत पाणीसाठा तेवढा झाला नाही. मात्र, पिकांसाठी पाऊस पोषक ठरला. मूग व उडीद काढणीच्या वेळी सलग पंधरा दिवस पाऊस झाल्याने या दोन्ही पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर सोयाबीन व अन्य पिके काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्या परिणाम उत्पन्नावर झाला. पीक कापणी प्रयोगातून ते स्पष्ट झाले व पैसेवारी ५५ पर्यंत पोचली.

रेणापूरची पैसेवारी जास्त
खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीनुसार रेणापूर तालुक्याची सरासरी पैसेवारी सर्वाधिक ६४ आली आहे. लातूर तालुक्याची पैसेवारी ५८, औसा - ५४, उदगीर - ५४, अहमदपूर - ५३, चाकूर - ५५, जळकोट - ५६, देवणी - ५४, निलंगा - ५४ व शिरूर अनंतपाळ तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी ५२ आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image