जिल्ह्यातील रिक्षा-टॅक्‍सीच्या क्‍यूआर कोडचे काम पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

औरंगाबाद : जिल्हाभरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स अखेर तयार झाले आहेत. चालक-मालकांची संपूर्ण कुंडली असलेले मराठीतून तयार केलेले क्‍यूआर कोड लवकरच रिक्षा, टॅक्‍सींवर झळकणार आहेत. 

औरंगाबाद : जिल्हाभरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स अखेर तयार झाले आहेत. चालक-मालकांची संपूर्ण कुंडली असलेले मराठीतून तयार केलेले क्‍यूआर कोड लवकरच रिक्षा, टॅक्‍सींवर झळकणार आहेत. 

ऑटोरिक्षा आणि टॅक्‍सीचालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी व असभ्य वर्तन केल्याच्या अनेक घटना घडतात. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य परिवहन प्राधिकरण समितीने संपूर्ण राज्यभर रिक्षा, टॅक्‍सी, कुल कॅब अशा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये परवानाधारक, चालक यांची माहिती त्याचप्रमाणे वाहनाचा क्रमांक, परवाना क्रमांक, वैधता, आपत्कालीन मदतीसाठी व तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक व मोबाईल ऍप दर्शविणारे क्‍यूआर कोड असलेले स्टिकर प्रवाशांना सहज दिसेल, अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला होता. 

त्यानुसार औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने खासगी कंपनीशी करार केलेला आहे. जिल्हाभरातील रिक्षा, टॅक्‍सीचालकांचा डेटा इंग्रजीत तयारही करण्यात आला होता. मात्र, ही माहिती मराठीत असावी अशा सूचना आल्याने हे काम लांबणीवर पडले होते. इंग्रजीतील डेटा मराठीत करण्याचे काम सुरू होते. नुकतेच हे काम पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

फिटनेससाठी येणाऱ्या प्रत्येक रिक्षाला क्‍यूआर स्टिकर लावले जाणार आहे. मात्र, त्याशिवाय अन्य रिक्षाचालकांनीही आरटीओ कार्यालयात जाऊन स्टिकर्स लावून घेणे आवश्‍यक आहे. 

दंडात्मक कारवाईची तरतूद 
रिक्षा, टॅक्‍सीमध्ये लावण्यात येणाऱ्या क्‍यूआर कोडसाठी रिक्षाचालकांना पन्नास रुपये आकारण्यात येणार आहेत. स्टिकर्स न लावणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईची तरतूद आरटीओ कार्यालयाने केली आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड किंवा पाच दिवस परवाना निलंबित, दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड किंवा दहा दिवस परवाना निलंबित आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड किंवा पंधरा दिवस परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

 

Web Title: Rickshaw-Taxi QR code work complete