क्‍यूआर कोड ठराविक जागेवर लावण्याला रिक्षाचालकांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद - जिल्हाभरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स रिक्षाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी रॉडला विशिष्ट पद्धतीने लावण्यास रिक्षाचालकांनी विरोध दर्शवला आहे. तुम्ही स्टिकर द्या, आम्ही रिक्षात सोयीच्या ठिकाणी चिकटवतो, अशी भूमिका सध्या रिक्षाचालकांनी घेतली आहे. 

औरंगाबाद - जिल्हाभरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स रिक्षाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी रॉडला विशिष्ट पद्धतीने लावण्यास रिक्षाचालकांनी विरोध दर्शवला आहे. तुम्ही स्टिकर द्या, आम्ही रिक्षात सोयीच्या ठिकाणी चिकटवतो, अशी भूमिका सध्या रिक्षाचालकांनी घेतली आहे. 

ऑटोरिक्षा, टॅक्‍सीचालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी व असभ्य वर्तन केल्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण समितीने संपूर्ण राज्यभर रिक्षा, टॅक्‍सी, कुलकॅब अशा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये परवानाधारक, चालक यांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेतला होता. वाहनाचा क्रमांक, परवाना क्रमांक, वैधता, आपत्कालीन मदतीसाठी व तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक व मोबाईल ॲप दर्शविणारे क्‍यूआर कोड असलेले स्टिकर प्रवाशांना सहज दिसेल अशा पद्धतीने लावण्याचे हे अभियान आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने राज्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला; मात्र ही माहिती मराठीत करण्यासाठी विलंब झाला; पण नुकतेच इंग्रजीतील डाटा मराठीत करण्याचे काम पूर्ण झाले. रिक्षा, टॅक्‍सीमध्ये लावण्यात येणाऱ्या क्‍यूआर कोडसाठी रिक्षाचालकांना पन्नास रुपये आकारण्यात येणार आहेत.

याअनुषंगाने आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक संघटनांची बैठक घेण्यात आली. त्यात रिक्षात स्टिकर्स लावण्यास रिक्षाचालकांनी संमती दर्शवली; मात्र रिक्षाच्या मध्यभागी टफच्या खाली असलेल्या लोखंडी रॉडला एकाच पद्धतीने लोखंडी पाटीवर स्टिकर्स लावावे, अशी आरटीओ कार्यालयाची भूमिका आहे. तर रिक्षात सोयीच्या जागेवर स्टिकर्स लावण्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. सध्या तरी रिक्षाचालकांचे मन वळवण्याचा प्रयत्न आरटीओ कार्यालय करत आहे.

दंडाची आहे तरतूद 
स्टिकर्स न लावणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईची तरतूद आरटीओ कार्यालयाने केली आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड किंवा पाच दिवस परवाना निलंबित, दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड किंवा दहा दिवस परवाना निलंबित आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड किंवा पंधरा दिवस परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Rickshawdriver oppose to QR Code