
आखाडा बाळापूर शेवाळा या दोन गावांच्या मधोमध जाणारा इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर अनेक शेतकरी शेती करतात.
आखाडा बाळापूर (हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरपासून जवळ असलेल्या इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याची दुरावस्था झाल्याने कालवा फुटण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात होत. यावर संबंधितांनी मुरूम टाकून थातूरमातूर दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु इसापूर धरणातून सोडलेले पहिल्याच पाण्यात वाहून गेल्याने निकृष्ट काम समोर आला आहे.
आखाडा बाळापूर शेवाळा या दोन गावांच्या मधोमध जाणारा इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर अनेक शेतकरी शेती करतात. पाण्याच्या जोरावर, पिके घेतात परंतु उजव्या कालव्याची अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे. सिमेंटचे बांधकाम दोन्ही बाजूने पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कालवा फुटून पाणी घुसून मोठे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पेनगंगा प्रकल्पाच्या विभागाने कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी गुत्तेदारला कंत्राट दिले.
परंतु संबंधित गुत्तेदार केवळ दोन्ही बाजूने मुरूम टाकून थातूरमातूर काम केले. परंतु मुरूम टाकलेल्या दोन्ही बाजू उजव्या कालव्याला सुटलेल्या पहिल्याच पाण्यात पूर्णपणे वाहून गेल्याने पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे उजव्या कालव्याची अवस्था सुधारण्याचे दिसून येत नाही. गुत्तेदार यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे पूर्वीपेक्षा आता कालव्याची अवस्था अजून गंभीर झाल्याचे दिसत आहे.
याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी कालवा फुटून शेतात पाणी घुसण्याची भीती व्यक्त केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून कालव्याची योग्य ती दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.