जालन्यात पावसाच्या शिडकाव्याला येईना जोर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी (ता.6) ढगाळ वातावरण होते. सकाळपासून जोरदार पावसाची अपेक्षा होती, मात्र अनेक भागात केवळ शिडकावा झाला. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत चोवीस तासांत केवळ 1.14 मिलीमीटर अशी अल्प पावसाची नोंद झाली आहे. 

जालना - जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी (ता.6) ढगाळ वातावरण होते. सकाळपासून जोरदार पावसाची अपेक्षा होती, मात्र अनेक भागात केवळ शिडकावा झाला. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत चोवीस तासांत केवळ 1.14 मिलीमीटर अशी अल्प पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात मंगळवारी अंबड शहरात रिमझिम पाऊस झाला. गोंदी परिसरात दिवसभर ढग दाटून आल्याने सूयदर्शन झाले नव्हते. सायंकाळनंतर पावसाने काहीशी हजेरी लावली. शहागड परिसरात रात्री सात वाजेनंतर हलक्‍या सरी कोसळल्या. भोकरदन तालुक्‍यातील वालसावंगी परिसरात अधूनमधून पाऊस पडत होता. घनसावंगी तालुक्‍यातील तीर्थपुरी परिसरात हलकीशी संततधार सुरू होती.

बदनापूर तालुक्‍यातील दाभाडी परिसरात मंगळवारी दुपारी दहा मिनिटे हलक्‍या सरी बरसल्या. दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत जालना तालुक्‍यात 0.38 मिलीमीटर तर एकजूनपासून आतापर्यंत 211.53 मिलीमीटर बदनापूर तालुक्‍यात 1.20 तर आतापर्यंत 245.80, भोकरदनला 1.13 तर आतापर्यंत 352.33, जाफराबादला 1.40 तर आतापर्यंत 294, परतूरला 1.20 तर आतापर्यंत 218.87, मंठा तालुक्‍यात आतापर्यंत 264.92, अंबडला 5.14 तर आतापर्यंत 220, घनसावंग तालुक्‍यात 0.86 मिलीमीटर तर आतापर्यंत 200.45 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मिलीमीटर एवढी असून 1 जूनपासून मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 250.99 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rimzim rain in Jalna district

टॅग्स