गृहमंत्री पार्टटाइम; गुन्हेगार फुलटाइम - विखे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद - राज्याला पार्टटाइम गृहमंत्री असल्याने गुन्हेगार फुलटाइम काम करीत आहेत. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री जबाबदारी टाळू शकत नाहीत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. शिवाय निरपराध नागरिक, व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी आणि दंगलीतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

विखे पाटील यांनी रविवारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'ही घटना पूर्वनियोजित असल्याचे पीडितांशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले. असे असताना पोलिसांची गुप्त शाखा हप्ते गोळा करण्याचे किंवा भजे खाण्याचे काम करीत आहे का,'' असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 'सरकार सामाजिक अशांतता निर्माण करून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कोरेगाव भीमा आणि औरंगाबादमधील घटनांवरून दिसते. येथील खासदार प्रक्षोभक वक्तव्य करतात, यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. प्रसारमाध्यमांतून त्यांची वक्तव्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी,'' अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: riot affected watching radhakrishna vikhe patil politics