रितेशने आणले डोळ्यात पाणी, वडिलांच्या आठवणी जागविणारा व्हिडिओ व्हायरल

Ritesh Deshmukh News
Ritesh Deshmukh News

लातूर : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र, अभिनेता रितेशने सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ पाहणाऱ्‍या सर्वांचे डोळे पाणावले. वडील आणि मुलाचे नाते किती घट्ट असते हे त्याने या व्हिडिओतून दाखवून दिले. हे नाते पाहून अनेकांच्या मनात विलासरावांबद्दलच्या आठवणीही जाग्या झाल्या. विलासराव देशमुख यांची तिन्ही मुले कर्तृत्ववान आहेत. अमित देशमुख हे राजकारणात असून, सध्या वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. रितेश देशमुख अभिनेता असून, धीरज देशमुख हेही राजकारणात असून, आमदार आहेत. रितेशवर विलासरावांचे जास्त प्रेम होते. त्याने चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विलासरावांनी त्याला प्रोत्साहन दिले.

‘तुझे मेरी कसम’पासून रितेशचा हा प्रवास सुरू झाला आहे. आज तो यशाचे शिखर गाठतो आहे; पण ते पाहण्यासाठी विलासराव नाहीत; पण त्यांच्या आठवणी मात्र रितेशसोबत कायमच्या आहेत. विलासरावांची जयंती असो किंवा पुण्यतिथी, तो सातत्याने वडिलांच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
विलासरावांच्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलासबागेत स्मृतिस्थळावर कार्यक्रम झाला. त्यावेळी रितेशने कुटुंबीयांसमवेत विलासरावांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्याने एक व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला. तो काही तासांत हिट झाला. या व्हिडिओतील आशय पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले.


कुर्ता, पायजमा आणि कोट हा विलासरावांचा पोशाख. या पोशाखात ते रुबाबदारही दिसायचे. त्याच पोशाखाचा आज रितेशने आपल्या व्हिडिओत खुबीने वापर केला. आज विलासराव असते तर त्यांनी गळाभेट घेत आपल्या डोक्यावरून, पाठीवरून मायेने हात कसा फिरविला असता, वडील आणि मुलाच्या नात्याचा मुलायम व हळुवार धागा कसा असतो, हे रितेशने दाखवून दिले. ‘मिस यू’ करीत रितेशही आपले अश्रू थांबवू शकला नाही. निःशब्द असलेला हा व्हिडिओ विलासरावांच्या आठवणी जागवणारा ठरला.


जिंदा हूँ मैं तो अभी...
रितेशने शेअर केलेला व्हिडिओ निःशब्द असला, तरी त्याला ‘अभी मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी, जगी धडकन नई
जाना जिंदा हूँ मैं तो अभी...’ या ‘अग्निपथ’मधील गाण्याचा वापर केला आहे. ‘जिंदा हूँ मैं तो अभी...’ म्हणत विलासराव अजूनही आपल्यात आहेत, अशी भावनाही रितेशने व्यक्त केली आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com