ऐन पावसाळ्यात नदी-नाले कोरडेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

परिसरात अधून-मधून रिमझिम पाऊस पडत आहे; पण तो पुरेसा नाही. त्यामुळे नदी, नाले व तलाव कोरडे आहेत. परिणामी, पावसाळा ऐन मध्यावर आला असतानाही जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिवाय आता दमदार पाऊस पडला नाही, तर रब्बीचे पीकही घेता येणार नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पाथरूड (जि. उस्मानाबाद) - परिसरात अधून-मधून रिमझिम पाऊस पडत आहे; पण तो पुरेसा नाही. त्यामुळे नदी, नाले व तलाव कोरडे आहेत. परिणामी, पावसाळा ऐन मध्यावर आला असतानाही जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिवाय आता दमदार पाऊस पडला नाही, तर रब्बीचे पीकही घेता येणार नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अंभी (ता. भूम) महसूल मंडळामध्ये पावसाची सरासरी सर्वांत कमी आहे. पाथरूडसह जांब-बावी, दुधोडी, बागलवडी, वडाचीवाडी, सावरगावसह परिसरातील खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. मध्यम पावसामुळे सध्यातरी पिकाला काहीअंशी जीवनदान मिळाले आहे. या वर्षात पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर एकदाही आले नाही. गेल्या दोन वर्षांपासून पाथरूड, आंबी, जांब, बावी, पाटसांगवी, बेदरवडी, जयवंतनगर, दुधोडी शिवारात कृषी विभागाने जलयुक्त शिवार, शिवजलक्रांती व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरण करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी कामे झाली आहेत; पण पावसाअभावी नदी, नाले व तलाव अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीपण नदी व तलावात पाणी साठवण होईल, अशा दमदार पावसाची हजेरी झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: River Rivulet Empty in Rainy Season Water