VIDEO : घरात सून गरोदर, बाहेर रस्ता खोदून ठेवलेला

संकेत कुलकर्णी
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सिडकोच्या पारिजातनगरात महापालिकेचा ढिसाळ कारभार 

औरंगाबाद - "शेजारी घरात सून गरोदर आहे; पण दारापुढे महापालिकेने रस्ता खोदून ठेवला आहे. अर्ध्या रात्री तिला दवाखान्यात न्यायची गरज पडली, तर आम्ही काय करावे?'' असा संतप्त सवाल सिडको एन-चार भागातल्या पारिजातनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेने केला. दुसऱ्या एका घरात 90 वर्षीय व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे; पण दारापुढे खणलेले खड्डे लोकांना त्रासदायक ठरत आहे. 

नव्याने बनवलेल्या कॉंक्रिट रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी महापालिकेने पारिजातनगरात रेनवॉटर ड्रेनेजलाइनचे काम हाती घेतले आहे; मात्र या भूमिगत गटारासाठीचे पाइप पुरेसे उपलब्ध नसल्यामुळे हे काम दहा दिवसांपासून लांबल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जेसीबी येऊन एका दिवसात गल्लीभर खड्डे खणून गेले. पुढे दहा दिवस झाले तरी पाइप आलेच नाहीत. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. महापालिकेने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी येथील रहिवासी प्रा. मनोरमा शर्मा, मनोज गुप्ता, प्रभाकर माशाळकर आदींनी केली आहे. 

कंपाउंडमध्येच अडकल्या गाड्या 

घरासमोर इथून तिथपर्यंत चर खणून ठेवला खरा; पण या गोंधळात अनेक लोकांच्या चारचाकी गाड्या कंपाउंडमध्येच अडकून पडल्या. एकाच दिवसात काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आल्यामुळे लोकांनीही समजुतीने घेतले; पण दहा दिवस झाले, तरी गाडी घराबाहेर काढण्याची सोय नसल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. त्यातच दसरा आला, तरी गाडी घरातच धुऊन पूजा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road dug in Parijatnagar