चिखलातून वाट काढत चिमुकले गाठतात शाळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

उमरगा - शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असलेल्या पतंगे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सतत वर्दळीचा व शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीच्या असणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसामुळे रस्त्यावर चिखल अन्‌ पाण्याचे डबके साचलेले असल्याने चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे.

उमरगा - शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असलेल्या पतंगे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सतत वर्दळीचा व शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीच्या असणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसामुळे रस्त्यावर चिखल अन्‌ पाण्याचे डबके साचलेले असल्याने चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे.

शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्याची चाळणी झाली आहे. पालिका प्रशासनाचे रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात रस्ते, नाल्यांची कामे प्रलंबित आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून महात्मा बसवेश्वर शाखेकडे जाणाऱ्या पतंगे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होऊन पाच वर्षे होऊन गेली. काम झाल्यानंतरच एक-दीड वर्षात रस्त्यावर खड्डे पडले होते. आता ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्‍न पडतो.

गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करताना मार्ग काढणे कठीण झाले आहे. या रस्त्याच्या कामाचा पालिका सभागृहात ठराव झाला आहे. त्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. मध्यंतरी विशेष रस्ता अनुदानाचा निधी आला होता, मात्र त्याची विभागणी सर्व प्रभागांत झाल्याने पतंगे रस्त्याच्या नवीन डांबरीकरणाचे काम तसेच राहून गेले.

पतंगे रस्ता वर्दळीचा झाला आहे. वाहनांची गर्दीही तितकीच झाली आहे. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लहान-मोठी अतिक्रमणे यामुळे पाऊस सुरू झाला की चिखलामुळे स्वामी विवेकानंद व महात्मा बसवेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. रस्त्यावरील चिखलातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. शाळेने अनेकवेळा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे पत्र दिले; पण मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यामुळे उलट चिखलाचा राडा होऊन निसरड्या रस्त्यावर मुले पाय घसरून पडण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत.

पतंगे रस्त्याच्या नवीन डांबरीकरणाचा व एका बाजूने नाली बांधण्याच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या कामासाठी एक कोटीचा निधी लागणार असल्याने विशेष रस्ता अनुदानातून निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- हंसराज गायकवाड, उपनगराध्यक्ष.

Web Title: Road Durability Child School