दीड किलोमीटरचा रस्ताच गायब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

शासनाने दिलेल्या 100 कोटींच्या निधीतून महापालिकेतर्फे 30 रस्त्यांची कामे केली जात आहेत. यातील काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असली तरी काही रस्त्यांची कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत.

औरंगाबाद- शासन निधीतील 30 रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना देण्यात आलेली मुदत डिसेंबरअखेर संपणार आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनासह अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून, कामे करण्यासाठी मात्र अतिक्रमणांचा अडथळा येत आहे. एका रस्त्यावर तब्बल दीड किलोमीटरपर्यंत घरे असून, आता कामे करायची कशी? असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे.

हेही वाचा - जालन्याचे चार तरुण अपघातात ठार

शासनाने दिलेल्या 100 कोटींच्या निधीतून महापालिकेतर्फे 30 रस्त्यांची कामे केली जात आहेत. यातील काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असली तरी काही रस्त्यांची कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत. दरम्यान, कंत्राटदारांना तीसही रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी फक्त एका महिन्याचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासह नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामे शिल्लक असलेल्या चार रस्त्यांची पाहणी केली. त्यात सिटी चौक ते गुलमंडी, औरंगाबाद बुक डेपो ते शनिमंदिर, व्हीआयपी स्टोअर ते पानदरिबा आणि शाहूनगर रामनगर ते मोर्या मंगल कार्यालय या रस्त्यांचा समावेश आहे.

या रस्त्यांवर काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत तर काही ठिकाणी भूसंपादन शिल्लक आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण करायची कशी? असा प्रश्‍न आता कंत्राटदार व प्रशासनाला पडला आहे. रामनगर भागातून निघून पुढे शिवाजीनगरपर्यंत जाणाऱ्या शाहूनगर ते मोर्या मंगल कार्यालय या रस्त्यावर तर दीड किलोमीटरपर्यंत रस्त्यावरच घरांचे बांधकाम झाल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे पाडापाडी करावी लागणार आहे. औरंगाबाद बुक डेपो ते शनिमंदिर हा रस्ता विकास आराखड्यात 15 मीटर रुंद आहे; मात्र सध्या चार मीटर इतकाच रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्याबाबत सोमवारी महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. 
 
अर्धा रस्ता डांबरी तर अर्धा व्हाइट टॉपिंगचा 
सीटी चौक ते पैठणगेट या रस्त्याचा सिटी चौकापासून गुलमंडीपर्यंतचा भाग उंच आहे. त्यावर व्हाइट टॉपिंग रस्ता बनविला तर दुकाने, घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे गुलमंडीपर्यंत डांबरी तर त्यापुढे पैठणगेटपर्यंत मात्र व्हाइट टॉपिंगचा रस्ता केला जाणार आहे.

कुठे? वाचा - काळीपिवळी जीप उलटली, 15 जण जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road missing Aurangabad