अहमदपूर तालुक्यातील पाटोदा नदीवरील रस्ता गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

अहमदपूर तालुक्‍यात तीन दिवसांपासून पाऊस; नदी-नाले वाहू लागले 

अहमदपूर (जि. लातूर) ः तालुक्‍यात मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आले असून, यात नदीला पूर आल्याने पाटोदा (ता. अहमदपूर) येथील नदीवरील पर्यायी रस्ता पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामळे अहमदपूर-अंबाजोगाई रस्त्यावरील वाहतूक मानखेड मार्गे वळविण्यात आली, तर रस्त्यावर विद्युत तारा पडल्याने काही काळ किनगाव कारेपूरमार्गे लातूर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. 

तालुक्‍यात सर्वदूर पावसाने कमी-अधिक प्रमाणात मागील चार दिवसांपासून हजेरी लावली असून मंगळवारी (ता. तीन) दुपारी कोपदेव हिप्परगा परिसरात जोरदार स्वरूपात पाऊस झाल्याने पाटोदा नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेला.

अहमदपूर-अंबाजोगाई रस्त्यावरील वाहतूक दुपारी चार वाजल्यापासून मानखेड, विळेगाव, तांबटसांगवी अशी वळविण्यात आली, तर काही बस किनगाव येथून परत अंबाजोगाईकडे जात आहेत. 

तालुक्‍यातील किनगाव, कोपरा, गोढाळा, खानापूर, अंधोरी ढाळेगाव, काजळ हिप्परगा या ठिकाणी मध्यम, तर कोपदेव हिप्परगा परिसरात जोरदार पाऊस झाला. खानापूर येथील शिवारातील विद्युत रोहित्र पडल्याने वाहतुकीस काही काळ अडथळा आला. मागील काळातील पावसाने पिकांना जीवदान मिळाले होते. या पावसाने पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The road on the Patoda river collapsed in stream

फोटो गॅलरी