दरोडे घालणारी टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

बीड - आष्टी आणि अंभोरा ठाण्यांच्या हद्दीत दरोडे घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून, या टोळीतील दोघांना या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीतील अन्य चौघांचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. 

बीड - आष्टी आणि अंभोरा ठाण्यांच्या हद्दीत दरोडे घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून, या टोळीतील दोघांना या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीतील अन्य चौघांचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. 

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सूचनांनुसार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथके जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या एका पथकाचे अधिकारी व कर्मचारी रविवारी (ता. पाच) आष्टी, अंभोरा परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत फिरत होते. या वेळी त्यांना दादेगाव (ता. आष्टी) व करंजीघाट (ता. पाथर्डी) येथील गुन्हेगारांनी 2016 व जानेवारी 2017 मध्ये अंभोरा ठाण्याच्या हद्दीत लोकांना मारहाण करून लुटमारीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांची माहिती काढून एकाला दादेगाव येथून, तर दुसऱ्या आरोपीला करंजीघाट येथून शिताफीने ताब्यात घेतले. संशयितांकडे कसून चौकशी केली असता, ते दोघे व सुरनरवाडी व बीडसांगवी (ता. आष्टी) येथील चार साथीदारांनी मिळून गतवर्षी घाटापिंपरी शिवारात मोटारसायकलवरील एका व्यक्तीला मारहाण करून लुटल्याची; तसेच खुंटेफळ शिंदे वस्ती व सालेवडगाव शिवारातील कराळे वस्तीवरील लोकांना रात्रीच्या वेळी मारहाण करून लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अंभोरा ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्या चार फरारी साथीदारांचा शोध गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. 

गुन्ह्यातील फिर्यादी शिवाजी भोर (रा. भोरवाडी, ता. अहमदनगर), सुरेश गणपत शिंदे (रा. खुंटेफळ शिंदेवस्ती ता. आष्टी), विठ्ठल गणपत कराळे (सालेवडगाव कराळे वस्ती, ता. आष्टी) यांचा जबरदस्तीने चोरलेला माल हस्तगत करण्याची कारवाई सध्या पोलिसांकडून सुरू आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलिस कर्मचारी भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, अंकुश महाजन, बाबासाहेब डोंगरे, सखाराम सारूक, चालक राठोड यांनी केली आहे.

Web Title: robbery gang arrest