रोहिणीच्या बरसल्या सरी अन् शेतकरी...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

दोन दिवसांपासून जिल्‍ह्यातील वातावरणात बदल जाणवत असून मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसला. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता.

हिंगोली : जिल्‍ह्यात मंगळवारी (ता. दोन) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास हिंगोली, वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावांत पावसाच्या सरी कोसळल्या असून खरीप पूर्व हंगामाच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

दोन दिवसांपासून जिल्‍ह्यातील वातावरणात बदल जाणवत असून मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तापमानाचा पारादेखील घटला आहे. यामुळे उष्णता कमी झाली आहे. सोमवारी रात्री उकाडाही फारसा जाणवत नव्हता. मंगळवार सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते.

हेही वाचाBreaking : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दुहेरी चिंता, सकाळी पुन्हा जमिनीतून आवाज 

पधंरा ते वीस मिनिटे पाऊस

 दरम्‍यान, सायंकाळी सहाच्या सुमारास वसमत तालुक्‍यातील गिरगाव, परजना, खाजमापूरवाडी, बोरगाव खुर्द, मुरुंबा, माळवटा, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, आंबा, मरसूळवाडी तसेच हयातनगर व परिसरातील काही गावांत पधंरा ते वीस मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. 

रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप

औंढा नागनाथ तालुक्‍यातील जवळा बाजार, पुरजळ, गोजेगाव, साळणा, कळमनुरी तालुक्‍यातील उमरा, खानापूर चित्ता, तसेच हिंगोलीशहर व तालुक्‍यातील अंधारवाडी, बळसोंड, कारवाडी, पिंपळखुटा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

मशागतीच्या कामांना वेग 

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मागील पंधरा दिवस सूर्य तापत होता. त्यामुळे केवळ सकाळ, सायंकाळच्या वेळी शेतातील सुरू असलेली कामे आता दिवसभर केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणीची कामे केली असून आता काडीकचरा वेचणी केली जात आहे.  

औंढा नागनाथ तालुक्यात पाणीटंचाई

औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाई जाणवत असून गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देत पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

येथे क्लिक करा -. हिंगोलीत एका कोरोनाबाधिताची भर, संख्या पोचली १८३ वर 
 
घागरभर पाण्यासाठी पायपीट

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कामात व्यस्त असताना इकडे अनेक गावांतील गावकऱ्यांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. तालुक्यातील देवाळा, तामटी तांडा, जलालदाभा, पाझरतांडा, देवाळा तर्फे लाख, सावरखेडा, भोसी, जांभळीतांडा या गावांत विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. दोन गावे प्रस्तावित आहेत. 

२४ तासांच्या आत मंजुरी 

तर सेवादास तांडा, रेवनसिंग तांडा, काळापाणीतांडा या चार गावांमध्ये दोन टँकरद्वारे पाणी चालू आहे. दरम्यान, अनेक गावांत पाणीटंचाई उपाययोजना प्रस्ताव कागदावरच धूळखात पडले आहेत. अनेक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, काही गावांचे प्रस्ताव आले तर प्रस्तावांच्या आधारे गावातील स्थळ पंचनामा करून २४ तासांच्या आत मंजुरी देण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी जगदीश साहू यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohini's Rain Showers And Farmers ...Hingoli News