विद्युत पुरवठ्याने बिघडवले पाणी वितरणाचे रोटेशन  

गणेश पांडे 
Sunday, 27 September 2020

धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. यामुळे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. तसेच पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढत आहे.   

परभणीः कधी राहाटी तर कधी धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे पाच-सात दिवसांवर आलेला पाणीपुरवठा पुन्हा दहा ते बारा दिवसांवर पोचला आहे. शनिवारी (ता.२६) दिवसभर धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद होते. त्यामुळे शहराच्या विविध भागांना पाणीपुरवठा झाला नाही. 

महापालिकेची यूआयडीएसएसएमटी व अमृत पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली असून, शहरात आता जुने-नवे असे १८-२० जलकुंभ झाले आहेत. त्यामुळे शहरातील पाण्याचे रोटेशन काही भागात पाच ते सात तर काही भागात दहा दिवसांवर आलेले आहे. 

हेही वाचा - जागतिक पर्यटन दिन : साईंच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारुपास

विद्युत पुरवठ्याचा मोठा अडथळा 
राहाटी व धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रांना होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. धर्मापुरीसाठी तर स्वतंत्र फिडर बसवण्यात आले असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे या वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यावरून दिसून येते. विशेष म्हणजे एकदा का वीजपुरवठा खंडित झाला, की त्याची दुरुस्तीच लवकर केल्या जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कधी राहाटी तर कधी धर्मापुरी येथे पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया ठप्प होत आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा, पाण्याचे रोटेशन विस्कळित होत असून नागरिकांवर पुन्हा पाण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा -  कोरोनाने मृत झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नगरसेवकाचा असाही पुढाकार

पाण्याचे वार व वेळेचे नियोजन आवश्यक 
सद्यःस्थितीत पाणी किती दिवसाला, कोणत्या वारी व कोणत्या वेळी येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे नागरिक कायम पाण्याच्या प्रतीक्षेत असतात. पालिकेने त्याचे वेळापत्रक तयार करून जाहीर करावे, केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व काही तांत्रिक कारणांनी विलंब झालाच तर नागरिकांना माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. 

अत्यावश्यक सेवेची तत्काळ दखल घेणे अपेक्षित 
धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे शनिवारी दिवसभर बंद होते. विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळत नाही. राहाटी येथील केंद्राची देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा लांबणीवर पडत आहे. विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अत्यावश्यक सेवेची तत्काळ दखल घेणे अपेक्षित आहे. 
- मिर्झा तनवीर बेग, अभियंता (पाणीपुरवठा), मनपा, परभणी. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotation of water distribution impaired by power supply, Parbhani News