विधायक : जालन्यात गरजूंसाठी इस्‍लामी हिंदची रोटी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोनाच्या संकटकाळात शहरातील भुकलेल्यांसाठी रोटी बँक 

जालना : शहरातील बहुतांश हॉटेल बंद आहेत. दरम्यान, कामानिमित्त परगावाहून येणाऱ्या व्यक्ती, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचे जेवणासाठी हाल होत आहेत. त्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी जमाअत-ए-इस्‍लामी हिंदने रोटी बँक उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यमातून गरजूंना अन्न दिले जात आहे. या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. 

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अडीच महिने लॉकडाउन होते. या काळात गरजूंना रेशन किट, ईदनिमित्त शिरखुर्मा, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार आदींसाठी जमाअत-ए-इस्‍लामी हिंदने पुढाकार घेतला. आता अनलॉकमध्येही संघटनेचे सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, पावसाळा असल्याने इतर आजारही बळावत आहेत. त्यामुळे शहरात आलेले रुग्ण, त्यांच्यासोबत असलेले त्यांचे नातेवाईक यांच्यासह शहरात कामानिमित्त येणारे इतर नागरिक यांची जेवणासाठी तारांबळ होत आहे.

विशेष करून रात्रीच्या जेवणाची अडचण येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या जनसेवा विभागाने पुढाकार घेऊन बारा दिवसांपासून रोटी बॅंक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत दोनशे गरजूंना संध्याकाळी जेवण दिले जात आहे. हे कार्य संपूर्ण बाजारपेठ सुरळीत सुरू होईपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती संघटनेचे शहराध्यक्ष सय्यद शाकीर यांनी दिली दिली.

मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

या सामाजिक कार्यात ज्या गृहिणी पोळ्या तयार करून मदत करीत आहेत त्यांचे आभार संघटनेने मानले आहेत. या उपक्रमासाठी अब्दुल मुजीब, शेख इब्राहिम, मुनव्वर खान, अब्दुल हमीद, एजाज बागबान लतीफोद्दीन सिद्दिकी, शेख मुश्ताक, अब्दुल कय्युम, शेख इस्माईल मजीदुल्लाह, सय्य्द हारीस पुढाकार घेत आहेत. 
 
मदतीचे आवाहन 
या उपक्रमासाठी शहातील दानशूर व्यक्तींनीही सहभाग घेऊन गरजूंना मदत करावी, असे आवाहन जमाअत-ए-इस्‍लामी हिंदच्या वतीने करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roti Bank at Jalna