आरटीईच्या यंदा दोन हजार जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

दुसरीकडे घेतले प्रवेश
लांबलेली प्रवेशप्रक्रिया, त्यानंतर १७ जून रोजी शाळा सुरू झाल्याने आपल्या पाल्यास प्रवेश मिळेल की नाही, या चिंतेत असलेल्या काही पालकांनी प्रवेशास पात्र ठरून देखील संपर्क केले नाहीत. तर ज्यांना अपेक्षा होती अशा पालकांच्या पाल्यांचे नंबरच यादीत आले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना प्रवेश मिळेल की नाही, या चिंतेमुळेच पालकांनी दुसरीकडे प्रवेश घेतले असे काही पालकांनी सांगितले.

औरंगाबाद - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. याअंतर्गत सध्या आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीची मुदत संपली असून, या फेरीस मुदतवाढ देऊनही दोन हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेशप्रक्रिया खूपच रखडली गेली. पहिल्या फेरीसाठीचा लकी ड्रॉ आठ एप्रिल रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर प्रवेशाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाली. या प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून शाळांची होणारी पाठराखण, कारवाईची अंमलबजावणी न करणे आणि शाळांची अनास्था, कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक अडचणी त्यामुळे पहिल्या टप्पा जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतरही सुरू होता. दुसऱ्या फेरीस १५ जूनपासून सुरवात झाली. दुसऱ्या फेरीसाठी जिल्ह्यातून एक हजार ८९० विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत प्रवेश निश्‍चत करणे बंधनकारक होते. तोपर्यंत प्रवेश पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या फेरीलाही दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी (ता.२९) संपली. त्यानंतरही बहुतांश प्रवेश रखडलेलेच होते. 

प्रवेशासाठी कालावधी वाढून दिल्यानंतर प्रवेश होतील अशी अपेक्षा होती; मात्र दोन फेऱ्या संपल्यातरी अजूनही दोन हजार ८३ जागांवर प्रवेश झाले नाहीत. या प्रवेशप्रक्रियेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ५८५ शाळांमध्ये आतापर्यंत झालेल्या फेरीसाठी पाच हजार ७२९ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी तीन हजार ४६२ प्रवेश झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE School 2000 Seats Empty Education