रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी आरटीओचे तक्रारपत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

औरंगाबाद - शहरातील रिक्षाचालकांची मनमानी आणि अवास्तव भाडे आकारणीच्या विरोधात आरटीओ कार्यालय सक्रिय झाले आहे. रिक्षाचालकांची सहज तक्रार देता यावी म्हणून आरटीओ कार्यालयाने छापील तक्रारपत्र तयार केले आहे.

औरंगाबाद - शहरातील रिक्षाचालकांची मनमानी आणि अवास्तव भाडे आकारणीच्या विरोधात आरटीओ कार्यालय सक्रिय झाले आहे. रिक्षाचालकांची सहज तक्रार देता यावी म्हणून आरटीओ कार्यालयाने छापील तक्रारपत्र तयार केले आहे.

शहरातील ऑटोरिक्षा चालकांची मनमानी सर्वश्रुत आहे. एकही रिक्षा मीटरने धावत नाही, मीटरने रिक्षा चालवण्याच्या मागणीसाठी वारंवार आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी करण्यात येत आहेत. वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी अखेर रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाईचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस शहरातील रिक्षांची तपासणी करून रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई केली. आता जे रिक्षाचालक प्रवाशांना त्रास देतात, किंवा अरेरावी करुन लूट करतात, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी परिवहन कार्यालयाने "तक्रारपत्र' तयार केले आहे. हे तक्रारपत्र शहर वाहतूक पोलिसांच्या बुथवर ठेवण्यात येणार आहे. या तक्रारपत्रातील नमुन्यात सहा मुद्दे दिले असून, त्याशिवाय तक्रार असेल तर त्याचीही नोंद करता येईल, तक्रारपत्राला तिकीट लावून टपालाने किंवा व्यक्तिश: खटला शाखेत पोहचते करावे लागेल किंवा तक्रार ईमेलवरही पाठवता येणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी दंड आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे रिक्षा चालवावी अन्यथा कार्यवाही केली जाईल, असा इशारा परिहवन कार्यालयाने दिला आहे.

असे असणार दंड
रिक्षाचालकांचे उद्धट वर्तन : पाचशे रुपये दंड
दूरच्या मार्गाने नेणे : पाचशे रुपये दंड
चालकाच्या शेजारी बसवून वाहतूक : पाचशे रुपये
सदोष मीटर वापरणे : पाचशे रुपये
आसन व्यवस्थेत बदल करणे : पाचशे रुपये
योग्यता प्रमाणपत्र नसणे : दहा हजार रुपये
बॅज, बिल्ला नसणे : पाचशे रुपये
गणवेश नसणे : तीनशे रुपये
वाहनाचा मागचा दरवाजा बंद नसणे : तीन हजार रुपये
रिक्षाची उजवी बाजू बंद नसणे : दीड हजार रुपये
टेरिफ कार्ड न दाखवणे : पाचशे रुपये
मीटर मुदतीत कॅलिब्रेशन न करणे : पाचशे रुपये
विनापरवाना जाहिरात प्रदर्शित करणे : तीनशे रुपये
ओळखपत्र न दाखवणे : पाचशे रुपये

Web Title: rto complaint letter to rickshaw driver