आरटीओच्या स्मार्ट आरसीला मिळेना मुहूर्त!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयातून नव्याने देण्यात येणारी आरसी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिलपासून स्मार्ट आरसी सुरू करण्यासाठी खासगी संस्थेशी करार करण्यात आला, मात्र अद्यापही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली नाही. जुन्याच पद्धतीने कागदावर आरसी देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आरटीओच्या स्मार्ट आरसी योजनेच्या अंमलबजावणीला मुहूर्त मिळत नसल्याची चर्चा सुरू आहे.

परिवहन विभागाकडून सध्या राज्यभर साध्या कागदावर आरसी बुक दिले जात आहे. तीन वर्षांपूर्वी "रोजमारता' या खासगी कंपनीचा करार संपल्याने स्मार्ट कार्डऐवजी साध्या कागदावर आरसी देण्यात येत होती. मात्र, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी "रोजमारता' कंपनीशी नव्याने करार करून राज्यभराचे काम त्यांच्यावर सोपवले. त्यामुळे एप्रिलपासून पुन्हा स्मार्ट आरसी देण्याचे काम सुरू होईल, असे परिवहन विभागाने सांगितले होते. प्रत्यक्षात करार करण्यात आला, मात्र कंपनीतर्फे अद्यापपर्यंत आवश्‍यक यंत्रणा कार्यरत केली नाही.

स्मार्ट आरसीसाठी औरंगाबाद कार्यालयात 35 अद्ययावत कॉम्प्युटरची व्यवस्था आणि आठ ते दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागणार आहे. मात्र, एप्रिल महिना अर्धा उलटूनही कंपनीने कार्यालय उभारणी व संगणक यंत्रणा उभारणीचे काम केलेले नाही. त्यामुळे अद्यापही कागदावर आरसी बुक देणे सुरू आहे. औरंगाबादेत तर अगदी साध्या पांढऱ्या कागदावर आरसी प्रमाणपत्र दिले जात आहे. या आरसीचा कागद हलक्‍या दर्जाचा असल्याने तो कसा सांभाळावा, अशी चिंता वाहनधारकांना पडली आहे.

Web Title: rto smart rc