शहरातून खेड्याकडे धाव; सावरलं घर अन्‌ शिवार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

लातूर - प्रलयकारी भूकंपाने होत्याचे नव्हते झाले. द्राक्षबाग उद्‌ध्वस्त झाली. अन्य शेती पिकेना. करायचे काय? जगावे कसे? गेलेले परत कसे मिळवावे, आदी प्रश्‍नांनी अस्वस्थता वाढत होती. त्यातूनच शहरातून खेड्याची वाट धरली. संयुक्त कुटुंबाच्या मदतीने घाम गाळून शेतशिवाराची सेवा केली. यश आले, कुटुंब सावरले. 

लातूर - प्रलयकारी भूकंपाने होत्याचे नव्हते झाले. द्राक्षबाग उद्‌ध्वस्त झाली. अन्य शेती पिकेना. करायचे काय? जगावे कसे? गेलेले परत कसे मिळवावे, आदी प्रश्‍नांनी अस्वस्थता वाढत होती. त्यातूनच शहरातून खेड्याची वाट धरली. संयुक्त कुटुंबाच्या मदतीने घाम गाळून शेतशिवाराची सेवा केली. यश आले, कुटुंब सावरले. 

एकोंडी (जि. लातूर) येथील नरेंद्र शिवाजीराव पाटील यांची ही कथा. 30 सप्टेंबर 1993 च्या पहाटे सास्तूर-किल्लारी परिसरात 6.4 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला. त्यात लातूर-उस्मानाबादच्या 52 गावांतील सुमारे नऊ हजारांवर माणसे मृत्युमुखी पडली. किल्लारीपासून अवघ्या दहा किलोमीटरवरील एकोंडी गाव भूकंपाचा केंद्रबिंदू होते. त्या वेळी नरेंद्र पाटील लातूरमध्ये शिक्षण घेत होते. भूकंपाच्या दिवशी आई-वडील गावाकडे होते. जुना वाडा कोसळल्यावरही सुदैवाने कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहिल्या. मात्र, भूकंपानंतर शेतीचे अर्थकारण बदलले. वडिलांची आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने शिक्षणात अडचणी येऊ लागल्या. लहान भावाचे शिक्षण, बहिणीच्या लग्नाचा प्रश्न होता. वडिलांनी लावलेली बारा एकरची द्राक्षबाग जगवणे जिकिरीचे झाल्याने अस्वस्थ नरेंद्र पाटील यांनी शहरातून गावाकडे धाव घेतली. मजुरांचा खर्च कमी करून स्वतः कष्ट करत बाग टिकविण्याचे प्रयत्न केले. दोन-तीन वर्षे परिश्रम करूनही पदरी अपयश आले. त्यांनी द्राक्षबाग मोडून भाजीपाला-कांदा आदी पिके घेतली. शेती हाच एकमेव आधार व संयुक्त कुटुंबामुळे सर्वांनी मिळून कामे केली. 

गाळलेल्या घामाचे चीज झाले. शेतीने सलग चार-पाच वर्षे दिलेली साथ व नातेवाइकांच्या मदतीने बॅंकांचे कर्ज वेळेत फिटले. भावाचे शिक्षण व बहिणीचे लग्न झाले. सद्यःस्थितीत आई-वडील, मोठा भाऊ, वहिनी, लहान भाऊ आणि मुले असे बारा जणांचे संयुक्त कुटुंब आहे. श्रीमंती नाही; पण खासगी सावकारांचे कर्जही नाही. त्यामुळेच संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. भूकंपानंतर अनेक संकटे येऊनही केवळ संयुक्त कुटुंब व्यवस्थेमुळे हे यश मिळाल्याचे पाटील सांगतात. 

प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी अजूनही अंगावर शहारे आणतात. जुना वाडा पडला. शेतातील विंधन विहीर जमिनीबाहेर आल्याने शेती कोलमडली. आर्थिक घडी विसकटली. संयुक्त कुटुंबाचा जिव्हाळा आणि कष्टाने केलेल्या शेतीवर घर सावरता आले. गेल्या 23 वर्षांत बारा जणांचे संयुक्त कुटुंब उभारताना मिळालेल्या आनंदाने भूकंपाचे दुःख विसरलो आहे.  

- नरेंद्र पाटील, एकोंडी, जि. लातूर.

Web Title: Run city village