लालपरी धावायला ; लाखाचे उत्पन्न लागली आणायला

गणेश पांडे
Thursday, 22 October 2020

लालपरीची चाके जस - जसी पळताहेत तस - तसे महामंडळाच्या तिजोरीतही लक्ष्मीचे आगमन होत असल्याचे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. एकट्या परभणी विभागास दररोज 25 लाखाच्या आसपास उत्पन्न होत आहे.

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गामुळे बंद करण्यात आलेली महाराष्ट्राची लाडकी लालपरी आता परत एकदा रस्त्यावर दिमाखात पळतांना दिसत आहे. लालपरीची चाके जस - जसी पळताहेत तस - तसे महामंडळाच्या तिजोरीतही लक्ष्मीचे आगमन होत असल्याचे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. एकट्या परभणी विभागास दररोज 25 लाखाच्या आसपास उत्पन्न होत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे एसटीची सेवा बंद होती. त्याचा परिणाम एसटीचे पूर्ण उत्पन्नच ठप्प झाले होते. मात्र, ऑगस्टमध्ये जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवेला प्रारंभ झाला. सुरवातीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नव्हता. या कालावधीत मिळणार्‍या उत्पन्नातून एसटीचा खर्चही निघत नसल्याने मालवाहू बससेवेचा महामंडळास मोठा आधार मिळाला. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मात्र लालपरी चांगलीच डौलात या गावाहून त्या गावांना फिरतांना दिसत आहे.

परभणी विभागातून लांबपल्याच्या बसेस मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. हिंगोली - मुंबई ही बससेवाही नुकतीच सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी हैदराबाद, नाशीक, कोल्हापूर, नागपूर, पंढरपूर, पुणे, वल्लभनगर (पिंपरी चिंचवड), अकोला आदी मार्गावर सुरू करण्यात आलेल्या या लंबपल्याच्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी कायम राहू लागली आहे. परभणी विभागातील ज्या मार्गावर प्रवाशी भारमान कमी आहे त्या मार्गावरील बससेवा बंद आहे. लांबपल्यासह इतर आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु झाली आहे. सध्या विभागातील 450 बसेसपैकी 275 बसेस नियमित धावू लागल्या आहेत. एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू  झाल्यानंतर विभागाच्या दैनंदिन उत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे. विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. सद्यस्थितीत दररोज 25 लाख रुपयांच्या आसपास सरासरी उत्पन्न होत आहे.

प्रवाशांच्या मागणीप्रमाणे एसटीच्या फेर्‍या वाढविण्यात येत आहेत. रेल्वेसेवा बंद असल्याने औरंगाबाद, नांदेड, पुणे या मार्गावर बसेसच्या जादा फेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

- मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To run red; Income of Rs parbhani news