ग्रामीण तरुण बनला उद्योजक

राजाभाऊ नगरकर
बुधवार, 15 जानेवारी 2020

जिंतूर तालुक्यातील पुंगळा (जि.परभणी)येथील पांडुरंग जगताप यांनी गट्टूच्या व्यवसायातून सहा जणांना रोजगार दिला आहे.

जिंतूर (जि.परभणी) : जेमतेम शिक्षण व आर्थिक परिस्थिती बिकट, अशा परिस्थितीत गावगाडा हाकायचा... त्यात गावही लहान... त्यामुळे रोजगाराच्या संधीचा प्रश्र्नच नव्हता. पण, मोठे स्वप्न, जिद्द व मेहनतीच्या बळावर पुंगळा (ता. जिंतूर) येथील पांडुरंग बाळाभाऊ जगताप यांनी गट्टूचा उद्योग उभारून स्वत:ची उन्नती करत सहा मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा व पहा - Video : पेट्रोलपंप जनमानसांत विश्वासपात्र ठरेल : लोहिया

शिक्षण बेताचेच असलेतरी उद्योजक बनण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून असल्याने जगताप यांनी नोकरीच्या मागे न लागता उदरनिर्वाहासाठी सुरवातीला ठेकेदारीने घरे बांधणीचा व्यवसाय सुरू केला. परंतु, त्यात अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यामुळे खचून न जाता त्यांनी शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत जिल्हा खादी ग्रामोद्योग (परभणी) यांच्यामार्फत २०१४-१५ या वर्षी ‘गणेश सिमेंट गट्टू’ निर्मितीचा उद्योग सुरू केला. त्यासाठी जिंतूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेने त्यांना वीस लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला. यामधून मशनरी खरेदी, शेड बांधकाम, गोदाम, साठवणूक, विद्युतपुरवठा, कच्चे साहित्य खरेदी व मजुरी आदींसाठी अकरा लाखांची गुंतवणूक करून नऊ लाख रुपये खेळते भांडवल ठेवले व उत्पादन सुरू केले.

हेही वाचा - मिकीमाऊस, छोटा भीम, पोकी मॅन करतात स्वच्छतेचा जागर !

 तीन लाख रुपये नफा
 व्यवसायात लवकरच जम बसल्याने पहिल्या दोन वर्षांत (२०१५ व २०१६) खर्च वजा जाता अनुक्रमे दोन ते तीन लाख रुपये नफा झाला. त्यानंतरच्या दोन वर्षांत प्रत्येकी अडीच लाख रुपये पदरी पडले. तर सरत्या वर्षात तीन लाख रुपये नफा मिळाला. त्यातून बँकेची संपूर्ण कर्जफेड केली. गट्टू टिकाऊ असल्याने अलीकडे ग्रामपंचायतींतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे करण्याऐवजी ‘गट्टू’चे रस्ते करण्यावर भर देत असल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींकडून गट्टूंची मागणी केली जात आहे. शिवाय विविध समाज मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणीदेखील बांधकामासाठी गट्टू उपयोगात आणल्या जात आहेत. यावरून जगताप यांच्या व्यवसायाला भरभराटीचे दिवस आल्याचे चित्र आहे.

बेरोजगारांनी व्यवसायाकडे वळावे
या व्यवसायाकरिता जिल्हा ग्रामोद्योग व भारतीय स्टेट बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी मोलाची मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सिमेंट गट्टूच्या एका ब्रासमागे वीस टक्के निव्वळ नफा शिल्लक राहतो. त्यामुळे बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागे न धावता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतः उद्योजक बनावे.
पांडुरंग जगताप, व्यावसायिक
 

 

हेही वाचा व पहा -  अबब...! परभणीत विदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rural youth becomes entrepreneur