बॅंकांमध्ये झुंबड! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - पाचशे, हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर शुक्रवारी (ता. 11) बॅंका उघडण्याआधीच बॅंकांसमोर रांगा लागल्या होत्या. हजार, पाचशे रुपयांच्या नोटांचा बॅंकांमध्ये दिवसभर अक्षरशः पाऊस पडला. एका दिवसात बॅंकांमध्ये चारशे कोटी रुपयांपर्यंत हजार, पाचशे रुपयांच्या नोटा जमा झाल्याचा अंदाज आहे. नवीन पाचशे, दोन हजारांच्या नोटा घेण्यासाठीही झुंबड उडाली होती. गुरुवारी (ता. दहा) बॅंकांनी 80 ते 100 कोटी रुपयांपर्यंत पेमेंट केल्याचा अंदाज आहे. दिवसभर बॅंकांसमोर पैसे भरण्यासाठी आणि नवीन नोटांसाठी गर्दी कायम राहिली.

औरंगाबाद - पाचशे, हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर शुक्रवारी (ता. 11) बॅंका उघडण्याआधीच बॅंकांसमोर रांगा लागल्या होत्या. हजार, पाचशे रुपयांच्या नोटांचा बॅंकांमध्ये दिवसभर अक्षरशः पाऊस पडला. एका दिवसात बॅंकांमध्ये चारशे कोटी रुपयांपर्यंत हजार, पाचशे रुपयांच्या नोटा जमा झाल्याचा अंदाज आहे. नवीन पाचशे, दोन हजारांच्या नोटा घेण्यासाठीही झुंबड उडाली होती. गुरुवारी (ता. दहा) बॅंकांनी 80 ते 100 कोटी रुपयांपर्यंत पेमेंट केल्याचा अंदाज आहे. दिवसभर बॅंकांसमोर पैसे भरण्यासाठी आणि नवीन नोटांसाठी गर्दी कायम राहिली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बॅंकांसह सर्वच पोस्ट ऑफिसला पोलिस सुरक्षा पुरविण्यात आली होती. 
 

राष्ट्रीयीकृत असो की सहकारी सर्वच ठिकाणी रांगा 
जिल्ह्यात आणि शहरात जवळपास तीनशेपेक्षा जास्त राष्ट्रीयीकृत, को-ऑप., खासगी बॅंकांच्या शाखा आहेत. येथे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी, नवीन नोटा घेण्यासाठी बॅंका उघडण्याअगोदरच सर्वच बॅंकांच्या समोर सकाळपासून गर्दी होती. जवळपास सर्वच बॅंकांमध्ये पाय ठेवण्यासाठीसुद्धा जागा मिळणे अवघड झाले होते. गर्दी जास्त असल्याने बॅंकांनी दोनपेक्षा जास्त काउंटर पैसे जमा करण्यासाठी तर नवीन पाचशे, दोन हजारांच्या नोटा देण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले होते. तरी दिवसभर गर्दी कमी झाली नव्हती. दुपारच्या सत्रातसुद्धा कर्मचारी जेवणास गेले तरी नागरिक बॅंकेच्या बाहेर उभेच होते. हे सत्र बॅंका बंद होईपर्यंत सुरू होते. 
 

पैसे जमा करण्यासाठी घाई 
प्रत्येक जण बॅंकेत नवीन नोटा घेण्यापेक्षा जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी जास्त जोर देत होता. एकदाचे पैसे जमा झाले, की हुश्‍श करत तो बॅंकेतून परत जाताना दिसत होता. जवळचे पैसे खात्यात टाकल्यावर काही दिवसांनी किंवा एटीएमद्वारे नंतर पैसे काढता येतील म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते; मात्र काहीजणांनी लाखात रक्कम आणल्याने त्यांना आधारकार्ड, पॅनकार्डसह रक्कम जमा करावी लागत होती. बॅंकांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नसल्याने काही जणांनी लाखो रुपयांमध्ये रक्कम जमा केली. 
 

पाचशे, हजारांच्या नोटाच नोटा 
प्रत्येक बॅंकेच्या काउंटरवर दिवसभर पाचशे, हजारांच्या नोटांचे बंडलच बंडल येत होते. कर्मचारी या नोटा चेक करून त्या जमा करत होते. काही पाचशे, हजारांच्या नोटांबद्दल संशय असल्याने या नोटा बॅंकांनी घेतल्या नाहीत. मात्र, अशा घटना तुरळक ठिकाणी घडल्या. नोटा जमा करण्यासाठी झुंबड असल्याने सर्वच बॅंकांनी त्यासाठी काउंटर वाढविले होते. 
 

सेवानिवृत्त कर्मचारी आले धावून 
अनेक बॅंकांमध्ये निवृत्त कर्मचारी मदतीसाठी धावून आले होते. ते ग्राहकांना सर्व प्रकारची माहिती देत होते. तसेच धीर धरण्याचा सल्लाही देत होते. जास्तच गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठीही त्यांनी मदत केली. दिवसभर कर्मचाऱ्यांना गर्दीत बोलण्यासाठी वेळ मिळत नव्हता. कर्मचाऱ्यांची दिवसभर गर्दीत दमछाक झाली. 
 

बॅंकांकडे उशिराने आल्या नवीन नोटा 
राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये सकाळपासूनच तुफान गर्दी होती; मात्र सकाळच्या काही तासांत नवीन नोटा बॅंकांकडे आल्याच नसल्याने त्यांनी सर्वांत आधी खात्यात पैसे जमा करून घेण्यास सुरवात झाली. त्यानंतर कॅश व्हॅन आल्यानंतर पाचशे, दोन हजारांच्या नोटा देण्यास सुरवात करण्यात आली. 
 

नोटा बदलून देण्यासाठी फॉर्मची तीन रुपयांना विक्री 
नोटा बदलून देण्यासाठी बॅंका सात प्रकाराची माहिती असलेले फॉर्म घेत होत्या. बॅंकांकडील फॉर्म संपल्याने झेरॉक्‍स सेंटरवर हे फॉर्म तीन रुपयांना विक्री झाले. बॅंकांकडे फार्म संपल्याने सर्वजण झेरॉक्‍स सेंटरकडे बोट दाखवत होते. या फॉर्ममधून झेरॉक्‍स सेंटरनी हजारो रुपये कमावले. 
 

नोटा बदलून घेण्यासाठी भरावी लागली सात प्रकारची माहिती 
जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटांच्या बदल्यात बॅंकांमध्ये चार हजार रुपये दिले जात होते. त्यासाठी काउंटरवर नोटा बदलण्यासाठी सात प्रकारची माहिती असलेला फॉर्म भरून द्यावा लागला, या फार्ममध्ये.... 
बॅंकेचे नाव आणि शाखा 
नोटा बदलून घेणाऱ्याचे नाव 
ओळखपत्र आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, 
इलेक्‍शन कार्ड, पासपोर्ट, नरेगा कार्ड, 
ओळखपत्र क्रमांक 
जमा करत असलेल्या पाचशे, हजारांच्या 
नोटांचे विवरण आणि एकूण रक्कम 
नोटा घेणाऱ्याची सही 
ठिकाण आणि तारीख 
 

एसबीएचमध्ये 50 ते 60 कोटी जमा झाल्याचा अंदाज 
स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या जिल्ह्यात 23 शाखा आहेत. यांतील एका शाखेत जवळपास दिवसभरात पाचशे, हजार रुपयांच्या रूपात जवळपास अडीच कोटी रुपये जमा झाल्याचा अंदाज आहे. एकट्या स्टेट बॅंक ऑफ हैदराबादमध्ये 50 ते 60 कोटी रुपये जमा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला; तर स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेतून लोकांना शंभर, दोन हजारांच्या जवळपास 18 ते 20 कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आल्याची माहिती रवी धामणगावकर यांनी दिली. 

Web Title: rush in bank