रंगला चैतन्यदायी सोहळा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा गौरव अन्‌ सांस्कृतिक कार्यक्रमांना झालेल्या अलोट गर्दीने दृढ नात्याची साक्ष दिली. ‘पाऊल पडते पुढे’ ही थीम घेऊन मराठवाड्यातील विविध क्षेत्रांची झेप टिपणाऱ्या बहुपानी, बहुरंगी विशेषांकाचेही जोरकस स्वागत झाले.

‘सकाळ’चा वर्धापनदिन ही सर्वांसाठी एक पर्वणी असते. यंदाही हा सोहळा शनिवारी (ता. एक) अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. रांगोळीची सुंदर सजावट, सनईच्या मंजुळ स्वरांनी भारलेले वातावरण, ‘सकाळ’वर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या तुडुंब गर्दीत जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह गजबजून गेले. तेथे झालेल्या स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

स्नेहमेळा, सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सहापासूनच असला, तरी विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक, जाहिरातदार, हिंतचिंतकांची पावले सायंकाळी पाचपासूनच नाट्यगृहाकडे वळली. पाहता पाहता परिसर गर्दीने फुलून गेला. ‘सकाळ’तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे सर्वच घटकांनी कौतुक करीत ‘सकाळ’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेली ‘मराठवाडा - एक पाऊल पुढे’ ही विशेष पुरवणीही वाचकांना चांगलीच भावली. वर्धापनदिन आणि कर्तृत्ववानांचा गौरव ही ‘सकाळ’ची परंपराच. यावेळीही विविध क्षेत्रांत आपल्या कार्याची वेगळी छाप पाडणाऱ्या आठ असामान्य व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला.

उपस्थित मान्यवर
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार इम्तियाज जलील, आमदार संदीपान भुमरे, सुभाष झांबड, प्रशांत बंब, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजन क्षीरसागर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, उद्योजक राम भोगले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. व्ही. एस. भटकर, डॉ. गोवर्धन गायकवाड, डॉ. रेखा गायकवाड, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे कागिनाळकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. मोहन डोईबळे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना राठोड, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, जालन्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद खराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने, पंडित नाथराव नेरळकर, राम विधाते, बजरंग विधाते, ‘आयएमए’चे डॉ. हरप्रीत बिंद्रा, डॉ. राजेंद्र खेडकर, डॉ. मकरंद कांजाळकर, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी ‘सकाळ’ला शुभेच्छा दिल्या. 

उद्योजकांशी संवाद, सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत
ब्लू स्टार इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष बी. थियागराजन यांनी शहरातील उद्योजक, व्यावसायिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर अंशुमन विचारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘चाल... तुरू तुरू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली. विनोद आणि गाण्यांना भरभरून दाद मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Birth Anniversary Celebration