पीकविम्याची रक्कम कर्जात कपात केल्याने भाेसीत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदाेलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

बँकेतील सर्व शेतकऱ्यांची कामे नियमानुसार केली आहेत. काही शासकीय अडचणी आहेत. त्यामुळे मी याबाबत स्पष्ट बाेलू शकत नाही. आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून यावर ताेडगा काढता येईल का? याचा विचार करून शेतकऱ्यांवर अन्याय हाेणार नाही, याची दक्षता घेऊ. त्यासाठी आठ दिवसांचा अवधी मागितला आहे.
- चंदू भांडवले, शाखा व्यवस्थापक, देना बँक, भाेसी.

भाेकर- शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीकविमा मंजूर केला आहे. भाेसी (ता. भाेकर) येथील देना बँकेत मात्र, शाखा व्यवस्थापकाने चक्क विम्याची रक्कम कर्जात कपात केल्याने पंचक्राेशीतील संतप्त शेतकऱ्यांनी भाजपचे भाेकर बाजार समितीचे संचालक गणेश कापसे बटाळकर व उपसरपंच वसंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली साेमवारी (ता. १२) बँकेत ठिय्या आंदाेलन करून अधिकाऱ्यास धारेवर धरले. आठ दिवसांत न्याय देऊ, असे आश्‍वासन दिल्याने आंदाेलन माघारी घेण्यात आले.

राज्यात सतत तीन वर्षांपासून पावसाने डाेळे वटारल्याने शेती उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. बळीराजा आर्थिक संकटात सापडला. याचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीकविमा मंजूर केला. राष्ट्रीयकृत बँकेत संबंधित अधिकारी विम्याची रक्कम कर्जात कपात करत असल्याने शेतकरी वर्गांत संताप व्यक्त हाेता. याचा विचार करून ही रक्कम कर्जात कपात करू नये, असे शासनाचे आदेश दिल्याने हा प्रकार थांबला हाेता. पण भाेकर - नांदेड रस्त्यावरील भाेसी येथील देना बँकेत मात्र, त्या पंचक्राेशीत शेतकऱ्यांची विमा रक्कम कर्जात कपात केली जात हाेती. शाखा व्यवस्थापकास आणि वरिष्ठास याबाबत तक्रारी करूनही याकडे काेणीच लक्ष देत नव्हते.
बाजार समितीचे संचालक श्री. कापसे व भाेसीचे उपसरपंच वसंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे शाखाधिकारी यांना घेराव घालून बँकेत ठिय्या आंदाेलन केल्याने तब्बल तीन तास सर्व कामकाज ठप्प झाले हाेते. जाेपर्यंत आमची कपात केलेली रक्कम आम्हाला मिळणार नाही, ताेपर्यंत माघार नाही. गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरल्याने बराच गाेंधळ उडाला.
शेवटी पाेलिस व अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण हाताळल्याने हाेणारा माेठा अनर्थ टळला. आठ दिवसांत या प्रकरणी चाैकशी करून शेतकऱ्यांना न्याय देऊ, दाेषी आढळल्यास कठाेर कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिल्याने आंदाेलन माघार घेण्यात आले.

तीन तास काम ठप्प
साेमवारी शेतकऱ्यांनी बँकेत अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने दैनंदिन कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे बँकेतील कामकाज तीन तास ठप्प हाेते. या वेळी पाेलिस निरीक्षक संदीपान शेळके, पाेलिस उपनिरीक्षक श्री. चव्हाण यांनी महिला पाेलिस, पाेलिस कर्मचाऱ्यांची तत्काळ व्यवस्था केली.

भाेकरच्या अधिकाऱ्यांनी केली मध्यस्थी
संतप्त शेतकरी अधिक आक्रमक झाल्याने तेथील शाखा व्यवस्थापकाची भंबेरी उडाल्याने त्यांनी भाेकर येथील देना बँकेचे शाखा व्यवस्थापक रवी आवटे यांना पाचारण केले. या प्रकरणात श्री. आवटे यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून ताेडगा काढल्याने शेतकरी थाेडे नरमले.

Web Title: sakal news breaking news nanded news farmer loan dena bank