काम करीत नसेल, तर कंत्राटदार बदला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद - स्मार्ट सिटीतील पहिल्याच कामाला विलंब होत असून, सौरऊर्जा प्रकल्पाचे संबंधित कंत्राटदार काम करत नसेल तर दुसरा कंत्राटदार नियुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

औरंगाबाद - स्मार्ट सिटीतील पहिल्याच कामाला विलंब होत असून, सौरऊर्जा प्रकल्पाचे संबंधित कंत्राटदार काम करत नसेल तर दुसरा कंत्राटदार नियुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश होऊन दोन वर्षे उलटूनही अद्याप एकही काम महापालिकेने पूर्ण केलेले नाही. २६ जानेवारीला पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते पहिल्या कामाचा नारळ फोडण्यात आला होता. महापालिकेच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून त्यातून निघणाऱ्या विजेचा महापालिकेच्या इमारतीसाठी वापर करण्यात येणार आहे. ५५ लाख रुपये खर्चाचे हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मार्च महिन्याची मुदत देण्यात आली होती. प्रशासनाने फेब्रुवारीतच हे काम पूर्ण होईल, असा दावा केला होता. 

चार महिन्यांत महापालिका इमारतीच्या छतावर केवळ लोखंडी फ्रेम लागल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापौरांनी सोमवारी (ता. ११) झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय छेडला. स्मार्ट सिटीतील पहिल्याच कामाला विलंब होत आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित कंत्राटदार काम करण्यास तयार नसेल, तर दुसरा कंत्राटदार नियुक्त करून हे काम पूर्ण करून घ्या, असे आदेश महापौरांनी नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना दिले. 

Web Title: sakal news impact aurangabad news