सीटी स्कॅनच्या वायरिंग, फिटिंगचा प्रश्‍न सुटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

सीटी स्कॅन यंत्र बंद असल्याने सामान्य रुग्णांना मोठा खर्च तर करावा लागतच होता. शिवाय निदान करण्यास होणारा उशीर जिवावरही बेतण्याचे प्रकार घडत होते. साडेचार वर्षे बंद असलेले सीटी स्कॅन उपलब्ध व्हावे, यासाठी ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि दोन कोटी रुपयांचे यंत्र उपलब्ध झाले.

बीड - सीटी स्कॅन यंत्र बंद असल्याने सामान्य रुग्णांना मोठा खर्च तर करावा लागतच होता. शिवाय निदान करण्यास होणारा उशीर जिवावरही बेतण्याचे प्रकार घडत होते. साडेचार वर्षे बंद असलेले सीटी स्कॅन उपलब्ध व्हावे, यासाठी ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि दोन कोटी रुपयांचे यंत्र उपलब्ध झाले. मात्र, त्याची वायरिंग आणि फिटिंगसाठी आर्थिक तरतूद नसल्याने ते पुन्हा पडून होते. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड धावून आले.

जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्र साडेचार वर्षांपासून नादुरुस्त होते. अपघाती आणि दुर्धर आजारी असलेल्या रुग्णांच्या शरीरातील तपासण्या करण्यासाठी आवश्‍यक असलेले यंत्र बंद असल्याने सामान्य रुग्णांना खासगी केंद्रात १७०० ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागत असे. 

अपघाती रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी नेमके आणि वेळेत निदान आवश्‍यक असते. मात्र, खासगी केंद्रात जाऊन तपासणी करून परत येण्यात दोन तासांपेक्षा अधिक जाणारा वेळ रुग्णांच्या जिवावर बेतण्याचीही शक्‍यता असते. त्यामुळे याबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केल्यानंतर सुरवातीला जिल्हा रुग्णालयाने एका खासगी केंद्रासोबत करार केला. यात अपघाती आणि दारिद्य्ररेषेखालील रुग्णांच्या तपासणीचे शुल्क जिल्हा रुग्णालय अदा करणार होते. परंतु वेळेत देयक न दिल्याने तो करारही रद्द झाला आणि पुन्हा रुग्णांची परवड सुरू झाली. दरम्यान, ‘सकाळ’ने पाठपुरावा सुरूच ठेवल्यानंतर जिल्हा रुग्णालयाला दोन कोटी रुपयांचे यंत्र मिळाले. परंतु, त्याची वायरिंग आणि फिटिंगसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद जिल्हा रुग्णालयाकडे नव्हती. याबाबत ‘सकाळ’ने ‘दोन कोटींचे सीटी स्कॅन आले; पण दोन लाखांमुळे खोळंबा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त प्रसिद्ध होताच सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी वायरिंग आणि फिटिंगचे काम पूर्ण करून दिले आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होऊन रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

‘सकाळ’मधून वृत्त प्रसिद्ध झाल्याने रुग्णांच्या अडचणी लक्षात आल्या. अशा कामांतून समाधान मिळते. गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होणार असल्याने आपण हे काम करून दिले.
- गौतम खटोड.

आता यंत्रणा बसवून त्याच्या वायरिंगचे काम पूर्ण झाले आहे. संबंधित एजन्सीला कळविले असून लवकरच सीटी स्कॅन सुरू होईल. आमचा पाठपुरावा सुरू आहे. 
- डॉ. अशोक थोरात

Web Title: sakal news impact The problem of CT scan wiring and fitting is solved

टॅग्स