पेन्शन अडीच हजार अन्‌ खात्यात ठेवा तीन हजार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

ईपीएफ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. त्यातच काही बॅंकांनी खात्यात तीन हजार रुपये नेहमीसाठी ठेवण्याचा फतवा काढला. त्यामुळे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाह करायचा कसा, असा सवाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बॅंक प्रशासन आणि शासनाला केला आहे.
 

नांदेड- ईपीएफ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. त्यातच काही बॅंकांनी खात्यात तीन हजार रुपये नेहमीसाठी ठेवण्याचा फतवा काढला. त्यामुळे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाह करायचा कसा, असा सवाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बॅंक प्रशासन आणि शासनाला केला आहे.

स्टेट बॅंकेसह अन्य बॅंकांनी ग्राहकांसाठी काही नियम लागू केले आहेत. मात्र, आता हे नियम ग्राहकांसाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरत आहे. नव्या नियमानुसार बॅंकेच्या खातेदार ग्राहकांना तीन ते पाच हजार रुपयापर्यंत रक्कम बॅंकेत नेहमीसाठी ठेवणे अनिवार्य केले आहे. एवढी रक्कम ग्राहकांच्या खात्यात नसल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल, असा फतवा बॅंकांनी काढला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे. घरी पैसे ठेवण्याऐवजी ते बॅंकेत ठेवल्यास सुरक्षित राहतील. गरजेनुसार ते काढता येतील. हाच एकमेव उद्देश ठेवून ग्राहकांनी बॅंक खाते उघडून पैसे ठेवले. मात्र, आता बॅंकेत खाते उघडून त्यात नेहमीसाठी तीन ते पाच हजार रुपये ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. या नियमाचा सर्वाधिक फटका पेन्शनधारक आणि सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.

मराठवाड्यात सुमारे एक लाख २० हजार ईपीएफ कर्मचारी असून त्यांचे स्टेटबॅंकेसह इतर बॅंकांमध्ये खाते आहेत. दर महिन्याला पेन्शन म्हणून त्यांच्या खात्यात एक ते तीन हजार रुपये जमा होतात. त्यावरच या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह आणि औषधोपचाराचा खर्च चालतो. पण, स्टेट बॅंकेच्या नवीन नियमानुसार आता खात्यात नेहमीसाठी तीन हजार रुपये ठेवायचे आहेत. त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास दंड आकारण्यात येणार आहे. या नव्या नियमाने ईपीएफ कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. पेन्शन स्वरूपात दर महिन्याला त्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होतात. त्यामुळे बॅंकेत तीन हजार रुपये ठेवले, तर आमचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बॅंकेने ईपीएफ कर्मचाऱ्यांना यातून वगळण्याची गरज असल्याचे ईपीएफओचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: sakal news nanded news bank issue

टॅग्स