बीडच्या शेतकऱ्यांना भेसळयुक्त खत विक्री; कंपनीविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

हैदराबाद येथील नवा भारत कंपनीकडून शेतकऱ्यांना विजया ग्रामिन हे रासायनिक भेसळयुक्त बोगस खत विकून फसवणूक केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

माजलगाव (जि. बीड) - खत विक्रीचा शासकीय परवाना नसतानाही भेसळयुक्त खताची विक्री करणाऱ्या हैदराबाद येथील नवा भारत फर्टिलायझर कंपनीविरोधात पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. जी. हजारे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी (ता. 13) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हैदराबाद येथील नवा भारत कंपनीकडून शेतकऱ्यांना विजया ग्रामिन हे रासायनिक भेसळयुक्त बोगस खत विकून फसवणूक केल्याचा प्रकार तालुक्‍यातील मोगरा, रामनगर तांडा येथील शेतकरी अंकुश चव्हाण, दिलीप राठोड, रोहिदास चव्हाण यांनी उघडकीस आणला होता.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

याबाबत शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा व फसवणूक थांबवावी, याबाबत मागणी केली होती. याची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने मंगळवारी (ता. 11) गुणवत्ता नियंत्रक व कृषी विभागाच्या पथकाने माजलगावला येऊन सदरील खताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

सदरील कंपनीकडे उत्पादन आणि विक्री करण्याचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याची तक्रार पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. जी. हजारे यांनी ग्रामीण पोलिसांत गुरुवारी दिली. यावरून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच खताची खरेदी करावी. शेतावर खत विक्रीसाठी येणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खत खरेदी करू नये व होणारी फसवणूक टाळावी. 
-एस. जी. हजारे, कृषी अधिकारी, माजलगाव  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of adulterated fertilizer to beed farmers