esakal | जालन्यात टपऱ्या, पिचकाऱ्या दोन्ही सुरूच 
sakal

बोलून बातमी शोधा

जालना ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेली पानटपरी.

कोरोनामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शहरासह जिल्ह्यातील टपऱ्या (पान सेंटर) बंद करण्याचे आदेश दिले होते; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत शहरासह जिल्ह्यातील टपऱ्या सुरू झाल्या असून, सर्रास गुटखा विक्री सुरू आहे

जालन्यात टपऱ्या, पिचकाऱ्या दोन्ही सुरूच 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना - सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शहरासह जिल्ह्यातील टपऱ्या (पान सेंटर) बंद करण्याचे आदेश दिले होते; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत शहरासह जिल्ह्यातील टपऱ्या सुरू झाल्या असून, सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी, पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विविध उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण राज्य बंद ठेवले होते. त्यामुळे लाखो जण कोरोनापासून वाचले; मात्र बेरोजगारीने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात गुटखा, तंबाखूसह इतर पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या, हॉटेल बंद करण्यात आले होते; परंतु तरीही या लॉकडाउनमध्ये अनेकांचे व्यवसाय मात्र तेजीत सुरू राहिले. परिणामी पोलिस प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा गुटखा या लॉकडाउनच्या काळात पकडला.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. अनेक व्यवसाय हळूहळू सुरू करण्याची परवानगी राज्य शासनासह स्थानिक जिल्हा प्रशासनाने दिली; मात्र अद्याप शहरासह जिल्ह्यातील टपऱ्या सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे सांगत आहेत; परंतु शहरातील चौकाचौकांत पान टपऱ्या सुरू झाल्या असून, दिवसाढवळ्या महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री जोरात सुरू आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पानटपऱ्यांसह येथे विक्री होणाऱ्या गुटख्याची अन्न व औषधी प्रशासनासह पोलिस प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे; परंतु पानटपऱ्या सुरूच नाही अन् गुटखा विक्री थांबलेली नाही. 

अन्न व औषधी प्रशासनाचे हात वर 

आमच्याकडे मनुष्य बळ नाही. त्यामुळे कारवाई करता येत नाही. पोलिसांकडे अधिक मनुष्यबळ आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या टपऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे जालना अन्न व औषधी प्रशासनाचे प्रभारी सहायक आयुक्त मिलिंद शहा यांचे म्हणणे आहे. 

शहरासह जिल्ह्यातील पानटपऱ्या सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश अद्याप आमच्या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत; परंतु आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे कारवाया करण्यास अडचणी येत आहेत. 
- मिलिंद शहा, प्रभारी सहायक आयुक्त, अन्न प्रशासन, जालना. 

पोलिसांवर अधिक कामाचा ताण आहे. सध्या कोरोनासह गणेशोत्सव बंदोबस्त आहे. त्यामुळे शहरातील पानटपऱ्यांसंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाने त्यांचे काम करणे गरजेचे आहे. 
- चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 

loading image
go to top