शेतकरी गटांकडून बीडमध्ये भाजी-फळांची दीड कोटीची उलाढाल, थेट ग्राहकांना विक्री

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने तालुक्यातील ग्राहकांना रोजच्या रोज ताजी फळे, भाजीपाला मिळावा, बाजारातील गर्दी टाळता यावी या उद्देशाने तालुका कृषी कार्यालयाने थेट ग्राहकांना भाजीपाला, फळे विकण्याचा शेतकरी गटांना परवाना दिला. त्यानुसार तालुक्यातील इच्छुक १३८ शेतकरी गटांनी या योजनेत सहभाग घेतला.

अंबाजोगाई (जि. बीड) - शेतकरी ते ग्राहक थेट व्यवहारातून शहरात दीड महिन्यात दीड कोटीची फळे व भाजीपाला विक्री करण्यात आली. या भागातील शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने तालुक्यातील ग्राहकांना रोजच्या रोज ताजी फळे, भाजीपाला मिळावा, बाजारातील गर्दी टाळता यावी या उद्देशाने तालुका कृषी कार्यालयाने थेट ग्राहकांना भाजीपाला, फळे विकण्याचा शेतकरी गटांना परवाना दिला. त्यानुसार तालुक्यातील इच्छुक १३८ शेतकरी गटांनी या योजनेत सहभाग घेतला. हे शेतकरी गट शहरातील १४ प्रभागांमध्ये विभागण्यात आले. वितरण व्यवस्थेवर नियंत्रणासाठी कृषी विभाग, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आले. त्याप्रमाणे सर्व कर्मचारी दररोज या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवू लागले. विनापरवाना विक्री करणाऱ्यांना दंड करू लागले. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

समिती ठरवते रोजचे दर 
तालुकास्तरावर भाजीपाल्याचे दर ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रोजच्या रोज भाजीपाला, फळांचे दर ठरवते. शेतकरी व ग्राहकांना फायदा होईल, असे पाहते. दरफलक वाहनावर लावणे गटांना बंधनकारक आहे. त्यामुळे ठरलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री होत नाही. विक्री व्यवहार करताना शारीरिक अंतर ठेवण्याचे बंधनही गटांवर आहे. या सर्व गोष्टींमुळे बाजारातील गर्दी कमी होऊन ग्राहकांना वाजवी दरात ताजी फळे, भाजीपाला मिळत आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत १३८ गटांनी शहरात तब्बल दीड कोटींची उलाढाल केली आहे. येथील हा उपक्रम जिल्ह्यात सर्वात यशस्वी ठरल्याचे सांगितले जाते. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

कृषी सहसंचालकांकडून मार्गदर्शन 
औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डी. एल. जाधव यांनी तालुक्यातील सनगाव येथील येडेश्वरी शेतकरी गटास शुक्रवारी (ता. १५) भेट दिली. शेतकरी गटामार्फत भाजीपाला, फळे विक्रीच्या उपक्रमावर मार्गदर्शनही केले. तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, मंडळ कृषी अधिकारी राजाराम बर्वे, कृषी पर्यवेक्षक सुरेश ढाकणे, कृषी सहायक पंडित काकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of vegetables and fruits in Beed by farmer groups