नोटाबंदीने विक्रीकरात घट होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

औरंगाबाद - आठ नोव्हेंबर 2016 ला एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्यापासून प्रामुख्याने सराफा, इलेक्‍ट्रॉनिक, कापड आणि वाहन बाजारातील हालचाली मंदावल्या होत्या. औरंगाबाद हे ऑटो हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे नोटाबंदीचा या क्षेत्रात तीस टक्‍क्‍यांपर्यंत घट झाल्याचा अंदाज आहे. त्याचा नकारात्मक परिणाम विक्रीकर वसुलीवर होण्याशी शक्‍यता उच्च अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

औरंगाबादमध्ये ऑटो उद्योग व त्याला पूरक लहान उद्योगांची संख्या शंभरांहून अधिक आहे. नोटाबंदीनंतर वाहन बाजाराला मंदीला सामोरे जावे लागले. वर्ष समाप्तीपूर्वी डिसेंबर महिन्यात देखभाल व दुरुस्तीच्या कारणास्तव काही दिवस ऑटो उद्योग कारखाने बंद ठेवले जातात.

त्याशिवाय नव्या वर्षात, नवे गाड्यांचे मॉडेल सादर करण्याची घाई सुरू असते. त्यामुळे डिसेंबरमध्ये काहीअंशी या उद्योगात मंदी बघायला मिळते. त्याला नोटाबंदीने बळकटी मिळाली. त्यामुळे या उद्योगात तब्बल तीस टक्‍के घट झाल्याचा अंदाज आहे. परिणाम थेट विक्रीकर वसुलीवरही झाला. बाजारपेठ अशीच कायम राहिल्यास चालू आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत हेच चित्र राहील, अशी शक्‍यता वर्तवली जाते.

त्यामुळे विक्रीकर वसुली जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्येही कमी होऊ शकते. विक्रीकर विभागाला विभागात नोव्हेंबर 2016 मध्ये 243.98 कोटींपैकी 214.31 कोटी, तर डिसेंबरला 216.23 कोटींपैकी केवळ 171.91 कोटी वसुलीचे उद्दिष्ट गाठता आले. डिसेंबर महिन्यात चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशे रुपयांच्या माध्यमातून मोठा विक्रीकर वसूल होण्याची अपेक्षा होती. मात्र, केवळ चार कोटी 29 लाख रुपयांवर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे सराफा, व्हाईट गुड्‌स, लिकर आणि फर्निचर उद्योगातील मंदीचाही परिणाम विक्रीकर वसुलीवर होण्याचा अंदाज आहे.

जीएसटीसाठी 26 हजार व्यापाऱ्यांची नोंदणी
चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जानेवारी-258.35कोटी, फेब्रुवारी- 192.32 कोटी आणि मार्चमध्ये 231.47 कोटी विक्रीकर वसूल करण्याचे विभागाला उद्दिष्ट आहे. एकूण वर्षाच्या 2890.80 कोटींपैकी आतापर्यंत 1936 कोटींचा पल्ला गाठण्यात यश आलेले आहे. आणखी नऊशे कोटी रुपयांच्या घरात उद्दिष्ट दूर आहे. याव्यतरिक्‍त व्यापाऱ्यांची जीएसटी नोंदणीही सुरू आहे. 14 नोव्हेंबर 2016 पासून 10 जानेवारीपर्यंत एकूण 26 हजार 295 व्यापाऱ्यांनी जीएसटीसाठी नोंदणी केलेली आहे.

Web Title: sales tax decrease by currency ban