एमआयएमने तोडले सलीम अली सरोवराचे गेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या सलीम अली सरोवराचे गेट एमआयएम पक्षाच्या महापालिकेतील गटनेत्याने तोडल्याचा प्रकार मंगळवारी (ता. एक) घडला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची तक्रार महापालिकेने पोलिसांत दाखल केली आहे. पक्षीमित्र संघटनेच्या याचिकेमुळे सरोवर परिसरात सर्वसामान्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रवेश बंदी आहे. 

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या सलीम अली सरोवराचे गेट एमआयएम पक्षाच्या महापालिकेतील गटनेत्याने तोडल्याचा प्रकार मंगळवारी (ता. एक) घडला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची तक्रार महापालिकेने पोलिसांत दाखल केली आहे. पक्षीमित्र संघटनेच्या याचिकेमुळे सरोवर परिसरात सर्वसामान्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रवेश बंदी आहे. 

ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. पक्षी निरीक्षणासाठी मचान, पाथवे, भव्य प्रवेशद्वार अशी कामे पूर्ण झाल्यानंतर सरोवर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले होते. या ठिकाणी बोटिंग सुरू करण्याचा महापालिकेचा मानस होता. त्याला  पक्षीमित्र संघटनांनी आक्षेप घेतला. या ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढल्यास सरोवरातील जैवविविधता धोक्‍यात येऊ शकते, अशा आशयाची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. तेव्हापासून सरोवरात प्रवेशबंदी आहे.

दरम्यान, एमआयएम पक्षाने कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभित केलेले सरोवर सर्वसामान्यांसाठी खुले करावे, अशी मागणी करत सरोवराचे कुलूप तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी गटनेता नासेर सिद्दिकी व कार्यकर्त्यांनी सलीम अली सरोवरावर धडक देऊन मुख्य प्रवेशद्वार कटरने कापून काढले. विशेष म्हणजे यावेळी पोलिसही हजर होते. दरम्यान, महापालिकेने या प्रकरणी न्यायालयाच्या अवमान केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. 

पोलिस बंदोबस्तात पुन्हा बसविले गेट 
एमआयएमच्या आंदोलनानंतर पोलिस पंचनामा करून पुन्हा सलीम अली सरोवराला गेट बसविण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

कायदा हातात घेण्याची वृत्ती वाढली 
एमआयएमच्या आंदोलनावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी टीका केली. कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती वाढली असून, एमआयएमला न्यायालयाच्या आदेशाचा आदर राहिलेला नाही, आम्हाला सरोवर कुलूप बंद ठेवण्याची हौस नाही, असे महापौर म्हणाले. 

पक्ष्यांसाठी एक तरी उद्यान राहू द्या - पाठक
नागरिकांसाठी शहरात मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. सलीम अली सरोवराशेजारील तीन उद्यानांचा वापर सुरू असताना अशा प्रकारचे आंदोलन करणे चुकीचे आहे. पक्ष्यांसाठी एक तरी उद्यान राहू द्या, अशी प्रतिक्रिया पक्षीमित्र किशोर पाठक यांनी एमआयएमच्या आंदोलनानंतर दिली.

Web Title: salim ali lake gate damage by MIM crime