समता महावाहन रॅली उत्साहात; शाहु फुले आंबेडकरांचा जयघोष

योगेश पायघन
बुधवार, 11 एप्रिल 2018

डॉ. आंबेडकर जयंती व फुले जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या संयुक्त रॅलीत नेहमीप्रमाणे कर्णकर्कश हॉर्न, समाजमन दुखवेल अशा घोषणा व मोठ्याने सायलन्सरचे आवाज न काढण्याची आचारसंहिता संयोजन समितीने घालुन दिली होती.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त बुधवारी (ता. 11) शहरातून काढण्यात आलेल्या महावाहन समता रॅलीने महापुरुषांच्या जयघोषाने शहर दणाणले होते. एक विचार एक मंचच्या प्रेरणेतून काढण्यात आलेल्या या संयुक्त समता रॅलीत मोठ्या संख्येने शहरातील युवक सहभागी झाले होते. 

महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन डॉ. आंबेडकर जयंती व फुले जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या संयुक्त रॅलीत नेहमीप्रमाणे कर्णकर्कश हॉर्न, समाजमन दुखवेल अशा घोषणा व मोठ्याने सायलन्सरचे आवाज न काढण्याची आचारसंहिता संयोजन समितीने घालुन दिली होती. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत होता, आवाहनाला कमी वेळेच्या नियोजनातूनही शहरातील प्रत्येक भागातून आंबेडकरी विचारधारेच्या युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आचार संहितेचे प्रत्येकाने केल्याने एक आदर्श घालून दिल्याचे विजय वाहुळ व सचिन निकम यांनी सांगितले. 

क्रांती चौकात बुधवारी (ता. 11) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन सुरुवात झाली. ही रॅली सिडको बस स्टँड मार्ग आंबेडकर चौक, टिव्हीसेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवाद करुन पुढे निघाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मानवंदना देत रॅली गुलमंडी औरंगपुऱ्यातील फुले पुतळ्याजवळ पोहचली तेथे पुतळ्याचे पुजन व वंदन करण्यात आले. त्यानंतर मिलकॉर्नर येथील छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिदन करुन रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी भारत बंद दरम्यान शहिद झालेल्या 14 आंबेडकरी अनुयायांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रॅलीत सहभागी तरुणाईने परिसराची साफसफाई करुन घेतली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Samata Mahamanav Rally in Aurangabad