भाजपचे आता मिशन संभाजीनगर

माधव इतबारे
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

राज्यात सत्ता आल्यानंतर नामकरणाचा ठराव सर्वसाधारण सभेत 19 जून 1995 मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने अधिसूचनाही प्रसिद्ध केली. तत्कालीन नगरसेवक महंमद मुश्‍ताक अहमद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात त्याला आव्हान दिले. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने नामकरणाला स्थगिती दिली.

औरंगाबाद- शिवसेना-भाजपमधील कुरघोड्यांचे राजकारण सुरूच असून, आता भाजपने शहराचे नाव "संभाजीनगर' करण्याचा प्रस्ताव समोर आणला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडत्या शहराचे नाव बदलण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात यावा. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नामांतर करण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल, असे नमूद केलेला प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांना दिला आहे. 

शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळविल्यापासून भाजप आक्रमक झाला आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सध्या भाजप सोडत नसल्याचे चित्र विधीमंडळापासून ते महापालिकपर्यंत दिसून येत आहे. शहरात शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी भाजपतर्फे नवनवीन विषय काढले जात आहेत.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

भाजपच्या आंदोलनानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांना नागपूर येथे जाऊन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू ठेवण्यासंदर्भात पत्र आणावे लागले. मात्र या पत्रात स्पष्टता असल्याचा आरोप करत गुरुवारी भाजप नगरसेवकांनी महापालिकेचे सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर आता संभाजीनगरच्या जुन्या विषयाला फोडणी देण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. शुक्रवारी (ता. 20) गटनेते प्रमोद राठोड, राजू शिंदे, दिलीप थोरात, विजय औताडे यांनी महापौरांना यासंदर्भात प्रस्ताव दिला. 
 
बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी... 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, असे स्वप्न होते. आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांना संभाजीनगर असे नामकरण करणे सोपे जावे, यासाठी सर्वसाधारण सभेत यासंदर्भात प्रस्ताव घेऊन तो मंजूर करावा, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. 
 
काय आहे वाद 
औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा वाद 1988 पासून गाजत आहे. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला. तेव्हापासून शिवसेना शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करते. त्यासोबत भाजप नेते सोयीनुसार संभाजीनगर-औरंगाबाद असा उल्लेख करतात. 1995 मध्ये युतीची राज्यात सत्ता आल्यानंतर नामकरणाचा ठराव सर्वसाधारण सभेत 19 जून 1995 मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने अधिसूचनाही प्रसिद्ध केली. तत्कालीन नगरसेवक महंमद मुश्‍ताक अहमद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात त्याला आव्हान दिले. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने नामकरणाला स्थगिती दिली. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर होऊ शकले नाही. आता भाजपने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी हा विषय ऐरणीवर घेतला आहे.

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhajinagar News from Aurangabad