‘समृद्धी’वर वनीकरणातून रोखणार प्रदूषण

आदित्य वाघमारे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - समृद्धी महामार्गावर ताशी दीडशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांचा गोंगाट आणि त्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वनीकरणाची कास धरली जाणार आहे. एका किलोमीटरमध्ये ६६३ झाडांची लागवड करण्याचा निकष यासाठी लावण्यात आला असून, ७०१ किलोमीटरच्या या मार्गावर सुमारे साडेचार लाख झाडांची लागवड केली जाणार आहे. 

राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गावर होणारा वाहनांचा गोंगाट आणि धुराच्या प्रदूषणाला लगाम घालता यावा यासाठी समृद्धी महामार्गालगत वनीकरणाचे काम केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग हरित धोरण २०१५ ला अनुसरून या रस्त्यावर एका किलोमीटर अंतरात ६६३ झाडांची लागवड करण्यात येणार आहे. याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतली आहे. 

तीन रांगांमध्ये लागवड 
सुमारे ७०१ किलोमीटरच्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची रुंदी ९० ते १२० मीटर राहणार आहे. सल्लागार संस्थेला संपूर्ण रस्त्याचा अभ्यास करून त्यावर झाडांच्या लागवडीची योजना ‘एमएसआरडीसी’ला सादर करावी लागणार आहे. ६६३ झाडे तीन रांगांमध्ये लावून त्यांच्या देखरेखीचे धोरणही याच संस्थेला तयार करून द्यावे लागेल. या कामाचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या भागात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा हे; तर दुसऱ्या भागात जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

हे होणार फायदे...
हरित मार्गाची निर्मिती
तापमान कमी ठेवण्यास मदत
रस्त्यालगतच्या हिरवळीने सौंदर्यात वाढ
वायू, ध्वनिप्रदूषण, धूलिकणांच्या प्रमाणात घट
अल्ट्राव्हायलेट किरणांना पायबंद
ऐतिहासिक वारशांचे प्रतिबिंब दिसणार
मातीची झीज रोखता येणार
उन्हाळ्यात गारवा

Web Title: Samruddhi Highway Pollution forestation