तेलंगणा पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिस धावले, उमरग्यात सराफ लाईनमध्ये दोन तास सुरू होता गोंधळ

अविनाश काळे
Wednesday, 28 October 2020

चोरीच्या प्रकरणातील आरोपीकडून सोने खरेदी केल्याप्रकरणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील पोलिस पथकाने बुधवारी (ता.२८) शहरातील एका सराफ दुकानदाराकडे चौकशी सुरू असताना सराफ व्यापाऱ्यांनी पोलिसांना विरोध करीत पोलीस पथकास घेराव घातला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तेलंगणाच्या पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिस धावून आल्याची घटना उमरग्यात बुधवारी (ता.२८) पाहायला मिळाली. चोरीच्या प्रकरणातील आरोपीकडून सोने खरेदी केल्याप्रकरणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील पोलिस पथकाने बुधवारी शहरातील एका सराफ दुकानदाराकडे चौकशी सुरू असताना सराफ व्यापाऱ्यांनी पोलिसांना विरोध करीत पोलीस पथकास घेराव घातला. दरम्यान या गोंधळाची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित पोलिसांना व्यापाऱ्याच्या तावडीतून बाहेर आणले.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, औरंगाबादजवळ जादूटोण्याच्या संशयावरून अपंग व्यक्तीस दगडाने ठेचून मारले

या बाबतची प्राथमिक माहिती अशी की, २०१७ मध्ये हैदराबाद येथील एका चोरी प्रकरणातील आरोपीस हैदराबाद पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता त्याने चोरीतील ४० तोळे सोने उमरगा येथील एका सराफ व्यापाऱ्यास विकल्याची माहिती दिल्यावरून हैदराबाद पोलिसाचे दोन अधिकारी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी दुपार सराफ लाईनमधील एका व्यापाऱ्याकडे चौकशीसाठी गेले. त्या सराफ व्यापाऱ्यास चौकशीसाठी पोलिस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवून पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तास पोलिस व व्यापाऱ्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. सराफ लाईनमध्ये मोठी गर्दी, गोंधळ सुरु असल्याने उमरग्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसूरे व इतर पोलिसांनी मध्यस्थी करीत तेलंगणाच्या पोलिसांची सुटका करुन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. 

मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार

या वेळी सराफ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या संदर्भात सराफ व्यापारी दिलीप पोतदार बोलताना सांगितले की, ऐन दिवाळीत प्रत्येक वेळी तेलंगणा पोलिस कोणत्या तरी आरोपीस आणून सराफ व्यापाऱ्यांस पकडून घेऊन जाते व चौकशीच्या नावाखाली छळवणूक करतात असा आरोप केला. दरम्यान संबंधित प्रकरणाविषयी चौकशी करण्यासाठी हैदराबादचे पोलिस रात्री उशीरापर्यंत उमरग्यात येथे थांबून होते. या प्रकरणी हैदराबाद पोलिस पथकातील अधिकाऱ्याकडून या प्रकरणाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा चौकशीचा भाग आहे. मुद्देमाल जप्त केल्यावर माहिती सांगणे संयुक्तिक होईल असे सांगून या प्रकरणाविषयी अधिक भाष्य करणे टाळले. उमरग्याचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी तेलंगणा पोलिसांनी प्रथम तोंडी माहिती देऊन चौकशीला गेले, लेखी माहिती व प्रकरणाची पार्श्वभूमी सांगायला हवी होती. नंतर त्यांनी लेखी पत्र दिले, त्यांना येथील पोलिस सहकार्य करतील असे सांगितले.

सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणात चौकशीसाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या पोलिसांकडून कुठलीही शहानिशा न करता सराफ व्यापाऱ्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे सराफ व्यापाऱ्यांनी विरोध करून सर्व दुकाने बंद केली. यापूर्वीही तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या पोलिसांनी सराफ व्यापाऱ्यांना नाहक मानसिक व आर्थिकदृष्टीने त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. खरीच वस्तुस्थिती असेल तर व्यापारी पोलिसांना सहकार्य करतील. पण प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न योग्य नाही.
- सिद्रामप्पा चिंचोळे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarafa Traders Gherao Telangana Police In Umarga