
लातूर जिल्ह्यातील आष्टा (ता.चाकूर) गावात १४ व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून विकासकामे न करता ३१ लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्याला शनिवारी (ता.२९) पोलिसांनी अटक केली आहे.
चाकुर (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील आष्टा (ता.चाकूर) गावात १४ व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून विकासकामे न करता ३१ लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्याला शनिवारी (ता.२९) पोलिसांनी अटक केली आहे.
वाचा - सगळ्यात भारी कोथिंबीरी, शेतकऱ्यांना मिळून देई लाखो रुपयांचे उत्पन्न
आष्टा ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला २०१७ ते २०१९ या वर्षात १४ व्या वित्त आयोगातून एकूण ३० लाख ८० हजार ८८ रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. सरपंच पंचफुला रमाकांत पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी मासिक बैठका न घेता पाणीपुरवठा, रस्ता, पाईप लाईन, इमारत दुरूस्ती आदी कामासाठी हा निधी खर्च झाला असल्याची नोंद केली आहे. यासाठी ५१ व्यक्तींच्या नावाने धनादेश देऊन ते उचलण्यात आले आहेत. कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीने बैठकीत काम सुरु करण्यासाठी मान्यता घेतलेली नाही.
हेही वाचा - उदगीर पंचायत समितीची सत्ता भाजपकडून विरोधकांकडे गेली कशी ?
कामाचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, मूल्यांकन मोजमाप पुस्तिका, शाळेला ई-लर्निग साहित्य दिलेली पोच पावती, नाली, अंगणवाडी दुरुस्तीच्या कामासाठीची देयक याचे रेकाॅर्ड ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. याबाबत उपसरपंच व सदस्यांनी ता.२८ आॅगस्ट २०१९ मध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. गटविकास अधिकारी यांनी चौकशी करुन सरपंच व ग्रामविकास अधिकारी दोषी असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला होता. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा असे पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले. यावरून विस्तार अधिकारी श्रीअनंत पुठ्ठेवाड यांच्या फिर्यादीवरून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी याचा तपास करून सरपंच पंचफुला पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांना शनिवारी दुपारी अटक केली आहे. या दोघांना रविवारी (ता.३०) न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती श्री. तोटेवाड यांनी दिली.
(संपादन - गणेश पिटेकर)