शिक्षण संस्थांच्या बाहेर गुटख्याची ‘शाळा’

प्रकाश बनकर
गुरुवार, 3 जानेवारी 2019

औरंगाबाद - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी आहे. तसेच गुटखाबंदी आहे. शिवाय शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, जर्दा आणि माव्याच्या विक्रीवर बंदी आहे. असे असतानाही शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय परिसरात सहजरीत्या गुटखा, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ मिळतात; मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांचे दुर्लक्ष आहे, ही बाब ‘सकाळ’च्या पाहणीत उघड झाली.

औरंगाबाद - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी आहे. तसेच गुटखाबंदी आहे. शिवाय शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, जर्दा आणि माव्याच्या विक्रीवर बंदी आहे. असे असतानाही शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय परिसरात सहजरीत्या गुटखा, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ मिळतात; मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांचे दुर्लक्ष आहे, ही बाब ‘सकाळ’च्या पाहणीत उघड झाली.

दोन टपऱ्यांवर विक्री
स्थळ : महानगरपालिकेची न्यू मॉडर्न शाळा, भडकल गेट 
(वेळ सकाळी ११.५०)
शाळेबाहेर असलेल्या दोन टपऱ्यांवर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू होती. याच टपऱ्यांवर शालेय मुलांसाठी चिप्स, चॉकलेट व गोळ्या विक्रीसाठी आहेत. येथे मागेल त्याला सहजतेने गुटखा, सिगारेट मिळत होते.

छुप्या पद्धतीने विक्री
स्थळ : श्रीमती वेणूताई चव्हाण माध्यमिक विद्यालय, सिडको एन-८. (वेळ दुपारी १२.००)
शाळेच्या बाजूला असलेल्या दुकानात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू आहे. काही विद्यार्थीही येऊन गुटखा खरेदी करतात. त्यासाठी दोन वेगवेगळ्या पुड्या आहेत. दोन पुड्यांना एकत्र मिसळले की गुटखा तयार होतो.

दुकानांमध्ये गुटखा
स्थळ - मराठा हायस्कूल, चौराहा परिसर. (वेळ दुपारी १.२०) 
मराठा हायस्कूलच्या बाजूच्या टपरीवर ‘सकाळ’च्या बातमीदाराने ‘गुटखा आहे का?’ असे विचारले असता, ‘बाजूच्या टपरीवर मिळेल’, असे सांगण्यात आले. तेथे मागणी करताच तो मिळाला. परिसरातील बहुतांश लोक येथे गुटखा विकत घेण्यासाठी येतात.

नागपुरात हुक्‍का पार्लर ‘टार्गेट’ 
नागपूर - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी आहे. मात्र, कारवाईसाठी यंत्रणा सज्ज नसल्यामुळे कारवाई ‘शून्य’ आहे. शहर पोलिसांनी केवळ ८४ जणांवर धूम्रपानबंदी कायद्यांतर्गत कारवाई केली असून, हुक्‍का पार्लरला मात्र टार्गेट केले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाची दखल घेऊन सरकारने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानबंदीचा निर्णय घेतला. त्याला दहा वर्षे झाली. तरीही कायद्याचे उल्लंघन होते. अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी अनेकजण खुलेआम तंबाखू, मावा, खर्रा, बिडी, सिगारेट पिताना दिसतात. हुक्‍का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केल्यामुळे चालकांमध्ये दहशत आहे. या पार्लरमध्ये युवती अधिक असल्याचे समोर आले आहे.

तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वाचन, व्यायाम, कला, संगीत, छंद यात गुंतून राहावे. शाळा, महाविद्यालय प्रशासनाने १०० मीटर परिसरात गुटखा विक्री होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
- अमोल पोटे, सल्लागार, मुक्‍तांगण

सिगारेट, तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत शाळा, महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे. असे करणाऱ्यास दंडात्मक कारवाई व कमीत कमी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला जातो. या अंतर्गत शहरात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नऊ जणांवर कारवाई केली. पंधराशे रुपये दंडही वसूल केला आहे.
- मिलिंद शहा, सहायक आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन

Web Title: School Area Gutkha Sailing