स्कूल बसचा वापर सर्रास लग्नसमारंभासाठी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. 

औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. 

स्कूल बस ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयात प्रवासी कर भरावा लागतो; तर स्कूल बससाठी ही सूट दिली जाते. म्हणूनच स्कूल बसमधून प्रवासी वाहतूक करता येत नाही. स्कूल बसमधून प्रवाशांची वाहतूक करणे हे बेकायदेशीर आहे. या संदर्भात परिवहन विभागाने वारंवार परिपत्रके काढलेली आहेत; मात्र शासकीय आदेशाला स्कूल बसचालकांकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अन्य वाहनांच्या तुलनेत स्कूल बस कमी दरात मिळत असल्याने सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाला स्कूल बस भाड्याने देण्याचा सपाटा संस्थाचालकांनी लावला आहे. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या वर्षी आरटीओ कार्यालयाने काही स्कूल बसच्या विरोधात कारवाई केली होती. यंदा मात्र अशी कारवाई केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच संस्थाचालकांनी सर्रास वरकमाई करण्याचा नवीन फंडा शोधला आहे. यामुळेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळासह अन्य वाहनांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school bus is used for the wedding ceremony