शाळकरी चिमुकल्यांनी गिरवला ‘बाजारा’चा पाठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

बीड - तालुक्‍यातील मन्यारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता.२१) विद्यार्थ्यांनी बाजार भरविला होता. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व्हावे, हिशेब कळावे, भाषा व गणिती कौशल्यासोबतच कार्यानुभव विषयाचे ज्ञान मिळावे या हेतूने आठवडे बाजाराच्या धर्तीवर शाळेत बाजार भरविण्यात आला. 

बीड - तालुक्‍यातील मन्यारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता.२१) विद्यार्थ्यांनी बाजार भरविला होता. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व्हावे, हिशेब कळावे, भाषा व गणिती कौशल्यासोबतच कार्यानुभव विषयाचे ज्ञान मिळावे या हेतूने आठवडे बाजाराच्या धर्तीवर शाळेत बाजार भरविण्यात आला. 

यामध्ये विद्यार्थी स्वतः उत्पादक, व्यापारी बनले होते. बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी शेपू, पालक, मेथी, पात कांदे, वांगी, बटाटे अशा विविध भाज्या विक्रीसाठी मांडल्या होत्या. बाजारातील समोसे, भजी, भेळ अशा चटपटीत पदार्थांनी खवय्यांना आकर्षित केले. चहाचे स्टॉलही या वेळी लावण्यात आले होते. पालक व  गावकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बाजारात सुमारे तीन हजार रुपयांची उलाढाल झाली. आंबेसावळी-मन्यारवाडी गावात आठवडे बाजार नाही. त्यामुळे या उपक्रमाला शेजारच्या आंबेसावळीच्या ग्रामस्थांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आता दरवर्षी डिसेंबर महिन्यात दुसऱ्या गुरुवारी शाळेतच बाजार भरविण्याचे लोकआग्रहास्तव शाळेने ठरविले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शात नवनाथ राठोड, दिलीप शिंदे, वैभव शिंदे, श्रीमती कवडे, श्रीमती बडदे यांनी परिश्रम घेतले.

पुनंदगाव जिल्हा परिषद शाळेतही बाजार

माजलगाव - दप्तराविना शाळा या उपक्रमातून तालुक्‍यातील पुनंदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. २१) भाजीपाला बाजार भरविला. मुख्याध्यापक श्री. देशपांडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी पांडुरंग घडसिंगे, उषा घडसिंगे, केंद्रप्रमुख श्री. ठोके, श्री. स्वामी, श्रीमती कदम व शिक्षकांची उपस्थिती होती. 

या वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला, चहा, फराळाचे स्टॉल्स लावले होते. पालकांनी या चिमुकल्यांच्या बाजारात खरेदी केली व त्यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. नायबळ, श्री. कांबळे, श्री. काळे, श्री. ढगे, श्रीमती काबरा यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे ए. एच. कदम यांनी कौतुक केले.

Web Title: school child market education