शुल्क न भरल्यामुळे शाळेने विद्यार्थ्याला डांबले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

उदगीर - एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीत शिकणाऱ्या सातवर्षीय बालकास अठरा हजार रुपयांच्या शालेय शुल्क वसुलीसाठी शाळा सुटल्यानंतरही थांबवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षिका, संस्थाचालक व अन्य एक अशा तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत शनिवारी (ता. १) रात्री गुन्हा दाखल झाला.

उदगीर शहरातील उदय कॉलनी परिसरात लिट्‌ल इंग्लिश स्कूल आहे. येथील एसटी कॉलनीतील एका व्यापाऱ्याचा मुलगा या शाळेत शिकतो. शुक्रवारी (ता. ३० नोव्हेंबर) नेहमीप्रमाणे तो वाहनातून शाळेत गेला. महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने शाळेची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत होती. मात्र शाळा सुटल्यानंतरही मुलगा घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी वाहनचालकाकडे विचारणा केली. अखेर मुलाचा शोध घेत ते शाळेत पोचले. दरम्यान, शाळेच्या कार्यालयात मुलगा रडत बसला होता. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, १८ हजार रुपये शुल्क दिले नसल्याने मुलास थांबवून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पालकाने मुलाला घरी आणले. 

शनिवारी (ता. १) मुलाने शाळेत जाण्यास नकार दिला. तेव्हा त्याच्या वडिलांनी शनिवारी रात्री ग्रामीण पोलिसांत शिक्षिका आशा ममदापुरे, संस्थाचालक राजकुमार ममदापुरे व सरफराज शेख या तिघांविरुद्ध शुल्क वसुलीसाठी त्यांच्या मुलास शाळेत थांबवून ठेवल्याची फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे

Web Title: School Fee Student Punishment Crime