जळकोटमधून शाळकरी मुलीचे अपहरण, सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

शिवशंकर काळे
Saturday, 19 December 2020

इयत्ता आठवी वर्गात शिकत असलेल्या शहरातील भवानीनगर मोंढा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी चारच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी मुलगी आजीला मोबाईल देण्यासाठी जात असताना रस्त्यात तिला बेशुद्ध करून चारचाकी वाहनाने अपहरण करण्यात आले.

जळकोट (जि.लातूर)  : इयत्ता आठवी वर्गात शिकत असलेल्या शहरातील भवानीनगर मोंढा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी चारच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी मुलगी आजीला मोबाईल देण्यासाठी जात असताना रस्त्यात तिला बेशुद्ध करून चारचाकी वाहनाने अपहरण करण्यात आले. या प्रकरणी जळकोट शहरात एकच खळबळ उडाली असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळकोट पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१९) अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी चारच्या दरम्यान सदरची मुलगी आपल्या आजीला मोबाईल देण्यासाठी साईनगर भागाकडे जात होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागच्या रस्त्यावरून जात असताना सदरील मुलीचे अज्ञात समाजकंटकांनी बेशुद्धीचे औषध लावलेला रुमाल त्या मुलीच्या तोंडाला लावून तिला बेशुद्ध केले व वाहनामध्ये घेऊन जळकोट शहरातून अपहरणकर्त्यांनी पळ काढला. चार तासानंतर शुद्धीवर आली असता माळेगाव (ता.लोहा, जि.नांदेड) या ठिकाणच्या स्वराज्य धाब्यावर हे वाहन थांबवण्यात आले होते. त्यावेळस मुलगी शुद्धीवर आली. वाहनात कोणीच नसल्याचे पाहून नजर चुकवीत माळेगावच्या दिशेने निघाली.

 

 

माळेगावच्या दिशेने धावत जाऊन तिच्या जवळ असलेल्या आजीचा मोबाईल वरून आपल्या वडिलांना सायंकाळी साडेआठ वाजता  मुलीने फोन केला. सदरची घडलेली हाकीकत आपल्या वडिलांच्या कानावर घातली. कहाणी ऐकुन वडिलांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी सोबत आपल्या मित्राला घेऊन माळेगाव गाठले. मुलगी कुठेतरी आडोशाला थांबून होती. फोन केल्यानंतर मुलीचा संपर्क झाला. आणि मुलीला घेऊन ते रात्री दहाच्या दरम्यान जळकोट येथील घर गाठले. घरी आल्यानंतर मुलीने आपल्या आईला व भावंडांना पाहून हंबरडा फोडला. मुलीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुली सोबत होणार पुढील अनर्थ टळला. याबाबत मुलीचे वडील आत्माराम काशिनाथ कल्याणकर (रा.लांडगेवाडी, ता.लोहा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.डी.बोईनवाड हे करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Going Girl Kidnapped From Jalkot Latur News