ग्रामीण भागात गळक्या शाळा अन्‌ पडक्‍या भिंती, सांगा शिक्षण कसे घ्यावे?

संदीप लांडगे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

  • जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन 
  • अतिवृष्टीमुळे नादुरुस्त वर्गखोल्या वाढल्या 
  • वर्गखोल्यांची दयनीय अवस्था
  • तिवृष्टीमुळे धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या

औरंगाबाद- जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 553 वर्गखोल्या धोकादायक असून अतिवृष्टीमुळे यंदा 393 वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 946 वर्गखोल्यांची दुरवस्था आहे. त्यापैकी 213 वर्गखोल्यांची दुरुस्ती झाली असून, अद्याप 733 वर्गखोल्यांची दुरुस्ती बाकी असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

यंदा अतिवृष्टीमुळे 393 वर्गखोल्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामध्ये काही खोल्यांच्या छतातून पाणी टपकणे, खिडक्‍यांना तावदान नसणे, भिंतींना तडे, उडालेले पत्रे, दरवाजा तुटणे, भिंती कमकुवत झाल्या असल्याचे प्रस्ताव मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेला सादर केले आहेत. अशा वर्गात विद्यार्थ्यांना बसणे अशक्‍य झाले आहे. असे असताना आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनाचा शासनाला विसर पडला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार 47 शाळांपैकी 733 शाळांच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था असल्याने शाळांच्या खोल्या, इमारत कधी कोसळतील याचा नेम नाही. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

शासनाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. यावर जिल्हा परिषदेकडून दुरुस्तीचे कामही काही प्रमाणात झाले; मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे काम पुन्हा रखडले. त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे आणखी 393 जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांची पडझड झाली. त्यामुळे दुरुस्तीसाठीच्या वर्गखोल्यांची संख्या वाढतच गेली. 

एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेतर्फे अतिवृष्टीमुळे धोकादायक बनलेल्या वर्गखोल्यांची माहिती जिल्ह्यातील शाळांकडून मागविण्यात आली होती. त्यात 393 शाळांनी वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, अद्याप शासनाकडून त्यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

जिल्हा परिषदेच्या शाळा 
मिळविताहेत नावलौकिक 

ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धत, डेन्स फॉरेस्ट, डिजिटल शाळा, इंटरनॅशनल शाळा, आयएसओ मानांकन शाळा, अशा वेगवेगळ्या उपक्रमांतून जिल्हा परिषदेच्या शाळा नावलौकिक मिळवीत आहेत. मात्र, काही अशाही शाळा आहेत, त्यांच्या वर्गखोल्या धोकादायक बनल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट बिकट बनली आहे. 

 

अतिवृष्टीमुळे दयनीय  अवस्था झालेल्या वर्गखोल्या 
तालुका दुरावस्था झालेल्या वर्गखोल्या
 औरंगाबाद  52
 पैठण 54
 गंगापूर 43
 कन्नड 10
वैजापूर  6
फुलंब्री 11
 सिल्लोड 67
सोयगाव 22

 हेही माहिती करून घ्या : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School- mismanagement - jilha parishad- aurangabad