सुटीच्या पगाराचं 'हे' गुरुजी काय करतात? वाचा-

Latur News
Latur News

अहमदपूर (जि. लातूर) : ज्ञानदानाचे कार्य करीतच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मे महिन्यातील सुटीच्या पगाराचा स्वतःसाठी वापर न करता, त्यातून होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा वसा घेणारे गुरुजी आहेत माधव शिवहर केंद्रे.

केंद्रेवाडी (ता. अहमदपूर) येथील रहिवासी असणारे माधव केंद्रे हे गंगाखेड (जि. परभणी) तालुक्‍यातील खंडाळी येथील श्री रोकडोबा माध्यमिक विद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. त्यांना चार बहिणी असून, त्यांची लग्ने झाली आहेत. तर नागनाथ हा भाऊ विनाअनुदानित विद्यालयात शिक्षक म्हणून काम करीत आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वडील शिवहर व आई चंद्रकला केंद्रे यांनी माधव यांना मोलमजुरी करून शिकविले. शिक्षण घेत असताना माधव यांना अनेकवेळा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. हीच वेळ इतर विद्यार्थ्यांवर येऊ नये, असे माधव यांना मनोमन वाटत होते.

यासाठी गेल्या तीन वर्षांपासून ते मे महिन्याचा पगार स्वतःसाठी न वापरता गरीब, होतकरू, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात. यासाठी त्यांनी श्री रोकडोबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते 'पाहणारे डोळे, मदत करणारे हात' या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य, गणवेश दिला आहे; तसेच अनेकांची परीक्षा फीसही भरली आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

माधव केंद्रे यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2017-18चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारातील 24 हजार रुपयांची रक्कम वापरून स्वतःच्या खंडाळी (ता. गंगाखेड) येथील शाळेला त्यांनी रंगरंगोटी करून घेतली आहे. याबरोबरच स्त्रीभ्रूणहत्या थांबावी, यासाठी गावोगावी जाऊन ते नाटक सादर करतात. शिवाय त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बांधांवर वृक्षलागवड केली आहे. 

यापुढे माधव केंद्रे यांना आपले कार्यक्षेत्र वाढवायचे असून, महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांना मदत करावयाची आहे. यासाठी त्यांना मदतीचे हात पुढे येत आहेत.

शिक्षण घेत असताना मला आलेली आर्थिक अडचण इतर विद्यार्थ्यांना येऊ नये यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याने भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती वाढवावयाची आहे. 
- माधव केंद्रे, शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com