शाळांना दिवाळीच्या पाचच दिवस सुट्या, ऑनलाइन अध्यापन राहणार बंद

हरि तुगावकर
Thursday, 5 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एकही दिवस शाळा भरली नाही. पण, ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू राहिले. आता दिवाळीचा सण येत आहे. या सणाला दरवर्षी वीस दिवस सुटी असते. पण, यावर्षी मात्र केवळ पाचच दिवस सुटी दिली जाणार आहे.

लातूर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एकही दिवस शाळा भरली नाही. पण, ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू राहिले. आता दिवाळीचा सण येत आहे. या सणाला दरवर्षी वीस दिवस सुटी असते. पण, यावर्षी मात्र केवळ पाचच दिवस सुटी दिली जाणार आहे. ता. १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधित या सुट्या असणार आहेत. तसे आदेशही शासनाने गुरुवारी (ता. पाच) काढले आहेत. राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नाहीत.

उस्मानाबाद आरोग्य विभागाने टाकली 'कात'

ता. १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करून परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते; तसेच शासनाच्या आदेशानुसार पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत तसेच एकूण कामाचे दिवस २३० दिवस होणे आवश्यक आहे.

सत्तेचा मोह असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प, विनायक मेटेंचा घणाघात

पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान २०० व सहावी ते आठवी वर्गाच्या शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस २२० होणे बंधनकारक आहे. शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने ता. १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवळी सण असल्याने शाळा सुट्या देण्यात येणार आहेत. तसे आदेशही शासनाने काढले आहेत. या कालावधीत शाळेमार्फत घेण्यात येणारे ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद ठेवावे, असे आदेशही शासनाने दिले आहेत. त्यामुळे ऑनलाइनवर शिक्षण घेत असलेल्या मुलांना पाच दिवसच सुट्यांचा आनंद घेता येणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools Have Five Days Holiday, Online Teaching To Be Close