परभणी जिल्ह्यातील शाळा दोन डिसेंबरपासून सुरू होणार

सकाळ वृतसेवा 
Sunday, 22 November 2020

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल प्राप्त न झाल्यामुळे (ता.दोन) डिसेंबरपासून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला.  

परभणी ः जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी रविवारी (ता.२२) शिक्षण विभागासमवेतच्या बैठकीत चर्चा करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल प्राप्त न झाल्यामुळे (ता.दोन) डिसेंबरपासून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यातही दहावी-बारावीचे वर्ग दोन डिसेंबरपासून तर नववी व अकरावीचे वर्ग त्यानंतर सुरु करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (ता.२२) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील शाळांच्या स्थितीचा, आरटीपीसीआर टेस्टचा आढावा घेतला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ, उपशिक्षणाधिकारी संजय ससाणे, विठ्ठल भूसारे यांच्यासह डॉ. कल्पना सावंत, विविध तालुक्यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. राज्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ता. २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतू, जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आरटीपीआर चाचणी करिता स्वॅब दिले. परंतू, त्यांचे अहवाल अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे ता.२३ नोव्हेंबरपासून हे वर्ग सुरु करणे स्थानिक प्रशासनाला शक्य होत नाही. 

हेही वाचा - जिंतूरमधील मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीला मालेगावातून अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

ग्रामीण भागात दोन डिसेंबरपासून वर्ग 
महापालिका क्षेत्र वगळता ता.दोन डिसेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीला दहावी व बारावीचे वर्ग सुरु होतील व त्यानंतर नववी व अकरावीचे वर्ग सुरु केले जाणार आहे. महापालिका क्षेत्रात वर्ग सुरु करण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित केले जाणार आहे. 

हेही वाचा - दिवाळीत एसटीची कोटीची उड्डाणे, परभणी आगाराची १० दिवसात चार कोटीची कमाई

शिक्षकांची २५ डिसेंबरपासून पूर्ण वेळ उपस्थिती 
महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ता.२५ डिसेंबरपासून पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचे या आदेशान्वये बंधनकारक करण्यात आले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर पालकांचे संमतीपत्र घेणे, उपस्थिती करिता संमती नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वर्ग सुरु ठेवण्याचे देखील आदेश आहेत. 

हॅन्डवॉश मशिन, थर्मल गण, ऑक्सीमिटर कार्यान्वित ठेवा 
२६ नोव्हेंबरपासून शाळेचे निर्जंतुकीकरण करून तसे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे, एखाद्या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास शाळा पाच दिवस बंद ठेवून निर्जंतुकीकरण करून परत चालु करणे, शाळेत हॅन्डवॉश मशिन, थर्मल गण, ऑक्सीमिटर पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे, आठवड्यातून किमान दोन वेळा शाळा निर्जंतुकीकरण करणे यासह ता.दोन डिसेंबरपासून मानव विकास बस प्रवास फेऱ्या पूर्व नियोजनानुसार सुरु करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी दिले आहेत.  

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in Parbhani district will start from December 2, Parbhani News