Video : ‘हे’ आहे माहूरगडानंतर दुसरे दत्ताचे देवस्थान

प्रमोद चौधरी
रविवार, 8 डिसेंबर 2019

शिवभक्षबन नावाच्या एका योग्याने आपल्या योगविद्येच्या आणि सामरा शास्त्राच्या साहाय्याने ब्रम्हयंत्र यंत्र शोधून काढले. त्याची कोलंबी येथील मठात कंधार येथील राजाच्या सहकार्याने ब्रम्हयंत्राची स्थापना केली

नांदेड :  काळ्या पाषाणावर कोरलेले हे ब्रम्हयंत्र भारतात काही मोजक्याच शहरामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यातील कोलंबी (ता.नायगाव) येथे हे ब्रम्हयंत्र असून, तेथे सहाशे वर्षांची गादी परंपरा आजही अखंडित सुरू आहे. दत्तमहाराज आद्यगुरु असल्याने दत्तशीखर माहूरनंतर दुसरे दत्ताचे देवस्थान म्हणून हे मंदिर परिचित आहे.  

मराठवाड्यातील कोलंबीचे ब्रम्हयंत्र मंदिर हे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी नटलेले दत्तमंदिर आहे. सदर मंदिर नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील नांदेड देगलूर मार्गावर कहाळ्यापासून १२ किलोमिटर अंतरावर कोलंबी येथे आहे. या गावाच्या पूर्वेला एक मठ आहे. तो मठ म्हणजेच इथले ब्रम्हयंत्र मंदिर आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात दत्तमहाराजांची प्रतिमा असून, माता अनुसयेचीही मूर्ती आहे. तसेच एका पाषाणावर कोरलेल्या ब्रह्मयंत्राची प्रतिष्ठापना केलेली आहे. याला श्रीयंत्र असेही म्हणतात. या ब्रह्मयंत्रावर विविध प्रकारची चिन्हे कोरलेली आहेत. एकूणच अशी ब्रम्हयंत्रे खूपच कमी आढळतात. नेपाळ, काशी, श्रींगेरी आणि कोलंबी या ठिकाणीच ही यंत्रे असल्याचे यदुबन महाराजांनी सांगितले.

हेही वाचा - सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन

असा आहे इतिहास 

शिवभक्षबन नावाच्या एका योग्याने आपल्या योगविद्येच्या आणि सामरा शास्त्राच्या साहाय्याने ब्रम्हयंत्र यंत्र शोधून काढले. त्याची कोलंबी येथील मठात कंधार येथील राजाच्या सहकार्याने ब्रम्हयंत्राची स्थापना केली. त्याला आज सुमारे सहाशे वर्षे झालेली आहेत. शिवभक्षबन यांनी सुरु केलेली गादी परंपरा आजही कायम सुरु आहे. त्यांच्यानंतर कुशदबन, गयबीबन, तुळशीबन, रामेश्वरबन, प्रसादबन, गंभीरबन या आद्यपुरुषांनी ही गादी सांभाळली आहे. सध्या आठवे आद्यपुरुष म्हणून यदूबन महाराज ही गादी परंपरा पुढे चालवित आहेत. मठातील आद्यपुरुषांचे दत्तमहाराज आद्यगुरु असल्याने हे दत्तसंस्थान म्हणून परिचित आहे. येथे ‘देवदत्त गुरुदत्त’ असा नामघोष सतत केला जातो.

काय आहे ब्रम्हयंत्र
ब्रम्हयंत्र हे सामान्यपणे एका विशिष्ट देवतेंशी संबंधित आहे. जे ध्यानधारणेसाठी तसेच हानिकारक प्रभावांपासून संरक्षण, विशिष्ट शक्तिंचा विकास करण्यासाठी या यंत्राची मोठी मदत होते. त्यासाठीच शिवभक्षबन महाराजांनी या ब्रम्हयंत्राची स्थापना केली आहे, अशी माहिती कोलंबी देवस्थानचे आठवे मठाधिपती यदुबन महाराजांनी दिली. सुमारे ६०० वर्षांपूर्वी शिवभक्षबन महाराजांनी कंधारच्या राज्याच्या सहकार्यातून ब्रम्हयंत्राची स्थापना मंदिरात केली. तेव्हापासून आजपर्यंत येथे या यंत्राची नियमित पूजा केली जाते. सृष्टीची निर्मिती ब्रम्हयंत्रापासून झालेली आहे. शिवाय ब्रम्हयंत्राची पूजा करून ध्यानधारणा केल्यास नवीन ऊर्जा प्राप्त होते. आसुरांवरही विजय प्राप्त करता येतो. विविध देवतांचे प्रतिनिधित्व हे यंत्र करत असल्याचेही यदूबन महाराजांनी सांगितले. मुख्यत्वे भारतीय धर्माच्या तांत्रिक परंपरेतून आलेली ही गूढ आकृती आहे. तिला ध्यानध्यारणेच्या सहाय्यात मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये देवतांच्या पूजनासाठी वापरले जाते. तसेच हिंदू ज्योतिषशास्त्र तसेच तथाकथित गूढ शक्तीचे फायदे मिळविण्यासाठीही ब्रम्हयंत्राची मदत घेतली जाते. ब्रम्हयंत्रामध्ये खास करून अनेक भौगोलिक आकार असतात. ज्यात त्रिकोण, वर्तुळे, षटकोन आणि चिन्हात्मक कमळांच्या पाकळ्यांचा समावेश असतो. बाहेरील भागात सहसा चार आधारभूत दिशांचे प्रतिनिधित्व करणारे चौकोन असतात.  

हेही वाचा - भाजलेल्या नातीचा मृत्यू, आजी-आजोबा गंभीर

असे होतात उत्सव 
कार्तिक पौर्णिमेला येथे तीन दिवसाचा मोठा उत्सव होतो. याला महाराष्ट्रासह आंध्रा, तेलंगना, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी अन्नपूजा, दुसरे दिवशी महापूजा व तिसरे दिवशी पालखी व चौथेदिवशी काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचे वाटप होते. ब्रह्मयंत्रास प्रथम पंचामृत स्नान घालून, त्यावर तांदुळाची रास रचली जाते. राशीतील तांदूळावर यंत्राप्रमाणे चिन्हे काढतात. हा सोहळा मोठा प्रेक्षणीय असतो मंदिराच्या पूजेची व्यवस्था माठाधीश महंतांकडे असते. हा माठाधीश महंत ब्रम्हचारी असावा लागतो. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचीही दंगल येथे होत असून, महाराष्ट्रासह परराज्यातील मल्लही यात सहभागी होतात, अशी माहिती गावातील ज्येष्ठांनी दिली.

यदूबन माराजांचा असा आहे परिचय 
मुळचे वांगी (ता.वडवणी, जि.बीड) येथील रहिवासी असलेले स्वामी यदूबन महाराज १९९२ पासून गादीपरंपरेचे आठवे मठाधीश. सातवे आद्यपुरुष गंभीरबन महाराजांकडून त्यांनी अनुग्रह घेतले. यदूबन महाराजांचे १० वीपर्यंतचे शिक्षण वांगी येथेच आजोबा शंकरराव करांडे यांच्याकडे झाले. आजोबा वारकरी संप्रदायात असल्याने त्यांच्यासोबत राहून मलाही अध्यात्माची गोडी लागल्याचे ते सांगतात. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचे किर्तन ते नियमित एेकायचो. तेव्हापासूनच मला भक्तीचा लळा लागल्याने बीड येथील संस्थानचे गणेशबन महाराजांकडे संपूर्ण जीवन समप्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी मला कोलंबी येथे आणले. येथे आणल्यानंतर गंभीरबन महाराजांकडून दीक्षा घेतली. आता गादीची परंपरा पुढे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भाविकांनीही आपले योगदान द्यावे                    माहूरनंतरची कोळंबी मंदिरात महंतांची गादी परंपरा आहे. गुरुप्रसादबन ट्रस्ट या नावाने या मंदिराची देखभाल सुरु आहे. भारतभरातील शिष्यांच्या सहकार्यातून सध्या सभामंडपाचे काम सुरु आहे. पंचक्रोशीतील भाविकांनीही आपले योगदान यात दिल्यास मंदिराचा विकास गतीने होण्यास मदत होईल.
- यदूबन महाराज (आठवे मठाधीश, कोलंबी देवस्थान)
 
१० वर्षांपासून शेतीचे काम बघतो                                कोलंबी येथे संस्थानची ६० एक्कर शेती अाहे. शिवाय गोपालनही होत असून भाविकांनी दान केलेल्या ६० गायी आहेत. मंदिरासाठी आर्थिकस्त्रोतासाठी सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर आदी पीके घेतली जातात. मी ३२ वर्षांपासून या मठामध्ये सेवा करीत असून, १० वर्षांपासून शेतीचे काम बघतो.
- साहेबराव महाराज (गोडापूर- तेलंगणा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'This' is the second Dutta's shikhar after the Mahurgad